व्हीएसआरएस मराठी न्युज –ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महापालिकेतर्फे बुधवारी (ता. ३) पिंपरीतील सावित्रीबाई फुले स्मारक येथे ‘महिला शिक्षण दिन’ साजरा केला जाणार आहे.
त्यानिमित्त विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन केले आहे. त्याअंतर्गत विविध प्रबोधनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचार व कार्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी विचार प्रबोधनपर्व आयोजित केले आहे. त्याचे उद्घाटन बुधवारी सकाळी अकरा वाजता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे होईल. तत्पूर्वी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जाईल. त्यानंतर तळमजल्यावर राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रकार सोमनाथ भोंगळे यांच्या कल्पनेतून साकारलेल्या रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. मोशी येथील महापालिका शाळेमधील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जाईल.
विचार प्रबोधन पर्वातील कार्यक्रम
– सकाळी ११.३० ः ‘मी तुमची सावित्रीबाई फुले’ हा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित एकपात्री नाट्यप्रयोग मेघना झुझम सादर करतील
– दुपारी १२.३० ः ‘सावित्रीच्या ज्योती’ हा संगीत, नाट्य, नृत्य आणि गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम रितेश नगराळे सादर करतील
– दुपारी २.३० ः महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होईल
– सायंकाळी ५ ः ‘सावित्रीच्या लेकी’ विषयावर परिसंवाद होईल
– सायंकाळी ७ ः निर्मित आर्टस प्रस्तुत ‘जागर समतेचा’ हा प्रबोधनात्मक कार्यक्रम धम्मरक्षित रणदिवे सादर करतील.
Discussion about this post