व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी । प्रतिनिधी
राज्यसभेच्या ६ जागासांठी झालेल्या निवडणुकीत भाजपाने ३ जागांवर विजय मिळवला. सहाव्या जागेसाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा दारुन पराभव केला. ही विजयाची घोडदौड यापुढील काळात कायम राहील, असे मत भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले.
राज्यसभा सदस्य निवडणुकीत भाजपाच्या विजयानंतर पिंपरी-चिंचवड भाजपातर्फे मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयात विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी महिला प्रदेशाध्यक्षा उमा खापरे, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, माजी महापौर माई ढोरे, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, रवी अनासपुरे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रभारी शंकर जगताप, सदाशिव खाडे, राजेश पिल्ले, पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, प्रदेश सचिव अमित गोरखे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, महिला मोर्चा शहराध्यक्षा उज्ज्वला गावडे, युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोंधे यांच्यासह माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली या निवडणुकीत भाजपाने यश मिळवले. भाजपा उमेदवारांना मतदान करणाऱ्या सर्व आमदारांचे मन:पूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच, पिंपरी-चिंचवडचे लोकनेते आमदार लक्ष्मण जगताप आणि पुण्यातील कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक आजारी असतानाही मतदानासाठी विधानभवनात आल्या. हा भाजपाच्या विचारांचा आणि कर्तव्यनिष्ठेचा विजय आहे.
महाराष्ट्र का नेता कैसा हो…देवेंद्र फडणवीस जैसा हो…
यावेळी भाजपा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आनंदोत्सवाच्या निमित्ताने मोठी गर्दी करीत शक्तीप्रदर्शन करण्यात आले. ‘‘महाराष्ट्र का नेता कैसा हो…देवेंद्र फडणवीस जैसा हो…’’, देश का नेता कैसा हो… नरेंद्र मोदी जैसा हो…’’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त करण्यात आला.
Discussion about this post