Pimpri News : पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेने २४ अनधिकृत जाहिरात फलक लावणारे आणि जागामालक यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.
भारतीय दंड संहिता १८६० अंतर्गत कलम ३३६, महाराष्ट्र मालमत्ता विरूपणास प्रतिबंध अधिनियम १९९५ अंतर्गत कलम ३, महानगरपालिका अधिनियम १८८८ अंतर्गत कलम २४४ आणि २४५ या कलमांतर्गत पिपंरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाहिरात फलक धारकांसमवेत झालेल्या बैठकीत आयुक्त शेखर सिंह यांनी अनधिकृत जाहिरात फलक हटविण्यासाठी फलक धारकांना सूचित केले होते. १५ ते २० मे २०२४ या कालावधीत महापालिकेने अनधिकृत जाहिरात फलक सर्वेक्षण केले त्यामध्ये २४ अनधिकृत जाहिरात फलक आढळून आले. महापालिकेने आतापर्यंत केलेल्या निष्कासनाच्या कारवाईमध्ये शहरातील एकूण २० अनधिकृत जाहिरात फलक हटविण्यात आले आहेत. त्यामध्ये ९ फलक महापालिकेच्या वतीने निष्कासित करण्यात आले असून ११ अनधिकृत फलक स्वतः फलक धारकांच्या वतीने हटविण्यात आले आहेत.
आयुक्त शेखर सिंह म्हणाले, सर्वेक्षणामध्ये आढळून आलेल्या सर्व अनधिकृत फलक धारकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून सर्व अनधिकृत फलक निष्कासित करण्याची कारवाई सुरू आहे. महापालिकेच्या वतीने फलक धारकांसाठी नवीन स्ट्रक्चरल ऑडिट फॉरमॅट लागू करण्यात येणार आहे. यामुळे जाहिरात फलक धारक शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करू शकतील आणि सुरक्षित जाहिरात फलक उभारण्याची जबाबदारी टाळू शकणार नाहीत. जाहिरात फलकांचे नियमित सर्वेक्षण आणि अनधिकृत फलकांवर होणारी कारवाई ही निरंतर प्रक्रिया असून ती पुढेही सुरूच राहणार आहे. तशा कारवाई सूचना सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
Discussion about this post