Pune News : पुणे : पुण्यातील कल्याणीनगर ‘हिट अॅन्ड रन’ केसमधील अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांना पोलिसांनी काल छत्रपती संभाजीनगर मधून अटक केली होती. त्यांना आज २२ मे रोजी न्यायालयात हजर करण्यासाठी पोलिसांनी व्हॅनमधून आणले असता काहीजणांनी व्हॅनवर शाईफेक केली. पोलिसांनी पाच ते आठ जणांना या प्रकरणी ताब्यात घेतले. ते वंदेमातरम या संघटनेचे कार्यकर्ते असल्याचे समजते.
या प्रकरणात जेव्हढा अल्पवयीन मुलगा जबाबदार आहे तेव्हढेच त्याचे वडील जबाबदार आहेत त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करा. एव्हढेच नव्हे तर त्या रात्री त्या मुलासोबत पबमध्ये दारू प्यायलेल्या सर्वांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी वंदेमातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली असल्याचे समजते.
२४ मे पर्यंत पोलीस कोठडी
दरम्यान कल्याणीनगर ‘हिट अॅन्ड रन’ केसमधील आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांना आज २२ मे रोजी शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले.
पोलिसांनी या प्रकरणात ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी न्यायालयाकडे केली. मात्र, न्यायालयाने २४ मे पर्यंत विशाल अग्रवाल यांना पोलीस कोठडी दिली आहे.
सरकारी वकिलांनी कोठडीची मागणी करताना विशाल अग्रवाल यांनी नोंदणी झाली नसलेली गाडी अल्पवयीन मुलाला चालविण्यास का दिली. तो अल्पवयीन आहे हे माहीत असताना त्याला पबमध्ये का जाऊ दिले. मुलाला पॉकेटमनी कशासाठी खर्च करण्यास दिला जातो. विशाल अग्रवाल फरार का झाले होते. त्यांना अट्क करण्यात आली तेव्हा त्यांच्याकडे एक साधा मोबाईल सापडला. बाकीचे मोबाईल कुठे आहेत. या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी पोलिसांना तपास करावयाचा आहे असे म्हणणे मांडले.
Discussion about this post