Pimpri News : पिंपरी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केल्याच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड शहरातील मोरवाडी येथे असलेल्या भाजपच्या कार्यालयासमोर ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली.
कार्यकर्ते इमारतीच्या प्रवेशद्वारातून भाजप कार्यालयात घुसू पहात होते. परंतु तेथे परिस्थिती हाताळण्यासाठी उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्यांना इमारतीत घुसू दिले नाही.
यावेळी आंदोलकांनी’जब जब मोदी डरता है, इडी को आगे करता है’ अशी जोरदार घोषणाबाजी केली.
या आंदोलनात आम आदमी पक्षाचे चेतन बेंद्रे यांच्यासह कार्यकर्ते, शिवसेना (उबाठा)तर्फे माजी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, बी.डी. यादव, समाजवादी पक्षाचे रवी यादव, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, मानव कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
यावेळी सर्व वक्त्यांनी देशाचे संविधान धोक्यात आहे, लोकशाही धोक्यात आहे. विरोधकांना निवडक तुरुंगात टाकले जात आहे. मोदींच्या विरोधात बोलणारा प्रत्येक आवाज बंद केला जात आहे. जनता पाहत आहे आणि योग्य उत्तर देण्याची वेळ आली आहे. सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी संघटित होऊन केंद्र सरकारच्या हुकूमशाहीला कडाडून विरोध केला पाहिजे असे सांगत केजरीवाल यांच्या अटकेचा तीव्र निषेध केला.
Discussion about this post