Pimpri News : तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे परिसरातून चोरलेल्या एकूण 19 दुचाकींसह आरोपींना तळेगाव दाभाडे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी हा मूळचा तळेगाव दाभाडे येथील रहिवासी असून तो या दुचाकी दुसऱ्या जिल्ह्यात त्याच्या ओळखीच्या मित्रांसह विकत होता.
उदयराज उर्फ कपिल निवृत्ती डमाळे (वय 40, तळेगाव दाभाडे) असे अटक आरोपीचे नाव आहे. चोरीच्या दुचाकी आतापर्यंत पालघर आणि इगतपुरी येथे विकल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे पोलीस दुचाकी चोरी प्रकरणाचा तपास करत असताना पथकाचे पोलीस शिपाई हर्षद कदम यांना एका गुप्त खबऱ्या मार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्ह्यातील चोरीचे वाहन छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभी आहे. माहिती मिळाल्यानंतर तपास पथकाने घटनास्थळी उभ्या असलेल्या दुचाकी चालकाची चौकशी करून त्याला मारुती मंदिर चौकातून ताब्यात घेतले.
डमाळे याने यांनी या परिसरातून इतर दुचाकी चोरून त्या वाहनांची इगतपुरीसह पालघर जिल्ह्यातील मोखाडा परिसरात त्याचा साथीदार लालू सखाराम मेंगाळ (कॉलनी वाडी इंदूरी, जिल्हा इगतपुरी, नाशिक) याच्या मदतीने विक्री केल्याचे सांगितले.
पोलिसांच्या तपास पथकाने आरोपींसह नाशिक आणि पालघर जिल्ह्यात छापे टाकले. इगतपुरी येथून 10, मोखाड्यातून 4 आणि तळेगाव दाभाडे परिसरातून 5 अशा एकूण 19 दुचाकी जप्त करण्यात आल्या, ज्यांची अंदाजे किंमत 4 लाख 75 रुपये आहे. हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पाटील (तळेगाव दाभाडे), तपास पथक प्रमुख रवींद्र खामगळ, हवालदार कोकतरे,कदम, सगर, ओव्हाळ, मोहिते, झेंडे, मदने व पथकाने केली.
Discussion about this post