व्हीएसआरएस मराठी न्युज –कोरोनामुळे २०२० व २०२१ ला हिवाळी अधिवेशन नागपुरात झाले नाही. कोरोनामुळेच सर्वच अधिवेशन मुंबईला झाली असली तरी त्याचाही कालावधी कमीच होता. यावर्षी कुठलीही अडचण नसल्याने विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार आहे.
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आढावा घेतला असून या अधिवेशनासाठी ९५ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. सोमवारपासून तयारीची कामे सुरू होणार असल्याची माहिती आहे.
बांधकाम विभागाकडून खर्चाचा आराखडा अंतिम करण्यात आला असून मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. मागील अधिवेशनाच्या तुलनेत ३० कोटींचा जास्त खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. नागपुरात होणारे अधिवेशन सहा आठवड्यांचे घेण्याचा करार आहे. परंतु गेल्या काही दशकाचा अनुभव पाहता साधारणतः दोन किंवा तीन आठवड्यांचे होते. यंदाचे अधिवेशन १९ डिसेंबरपासून सुरू होणार असून किमान दोन आठवड्यांचे होण्याची अपेक्षा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार अधिवेशनापूर्वीच करण्याचे संकेत दिले आहे. दुसरीकडे प्रशासनाने आपली तयारी सुरू केली आहे.
Discussion about this post