व्हीएसआरएस मराठी न्युज –पुणे-नाशिक महामार्गावर धावडेवस्तीच्यापुढे पीएमपी सद्गुरू डेपो चौक आहे. यातून दररोज शंभरपेक्षा अधिक पीएमपी बस ये-जा करतात. त्याचप्रमाणे या चौकातून इंद्रायणीनगरकडेही ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड आहे. या चौकात वाहतूक नियंत्रक दिवे बसविण्यात आले आहेत. मात्र, या वाहतूक नियंत्रक दिव्यांचे पालन वाहन चालकांकडून होताना दिसत नाही. त्यामुळे या चौकात नेहमीच वाहतूक कोंडी होत असल्याचे पहायला मिळते. ही कोंडी टाळण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिस विभागाद्वारे या चौकात इंद्रायणीनगरकडून येणाऱ्या दुचाकी, तीन चाकी व हलक्या चार चाकी वाहनांसाठी सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत बंदी घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मोशीकडून येणाऱ्या वाहनांनाही इंद्रायणीनगरकडे वळण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
पुणे-नाशिक महामार्गाचा धावडेवस्ती ते सद्गुरु डेपोजवळील रस्ता फक्त वीस फूट रुंद आहे. त्याचप्रमाणे सद्गुरु डेपोकडून ११० बस दररोज ये-जा करतात. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी होते. ती टाळण्यासठी वाहतुकीत बदल करण्यात येत आहेत. या बदलातून पीएमपी बस, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहने, पोलिस वाहनांना वगळण्यात आले आहे.
– दीपक साळुंके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भोसरी पोलिस वाहतूक विभाग
नागरिकांना सूचना करण्याचे आवाहन
या वाहतूक बदलाविषयी २१ जुलैपर्यंत नागरिकांनी त्यांच्या सूचना लेखी स्वरूपात पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाच्या पोलिस आयुक्तांकडे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Discussion about this post