व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –पिंपरी-चिंचवडमधील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवरील खडे बुजवून नागरिकांचा प्रवास सुखाचा झाला पाहिजे. त्यासाठी ‘खड्डे मुक्त पिंपरी-चिंचवड’ मोहीम प्रभावीपणे राबवण्यात यावी. येत्या १५ डिसेंबरपर्यंत शहर खड्डेमुक्त झाले पाहिजे, असा ‘अल्टिमेटम’ भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी दिला आहे.
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना रस्त्यांवरील खड्डयांपासून होणाऱ्या त्रासातून मुक्तता करण्याबाबत उपाययोजना करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले होते.
या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिका भवनात आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी प्रशासक व आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, प्रदीप जांभळे-पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे, वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण गोफणे, शिक्षण विभागाचे उपायुक्त संदीप खोत, प्रशासन अधिकारी संजय नायकडे उपस्थित होते.
Discussion about this post