व्हीएसआरएस मराठी न्युज –मुंबई : मालेगावमधील महापौरांसह सर्व नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यानंतर काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. त्यावर राजकारणात फोडाफोडी होतचं असते; त्याला जशास तसे उत्तर द्यायचे असते असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही नेते, कार्यकर्ते काँग्रेसमध्ये येणार असल्याचा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मध्यंतरी दिला होता. तो इशारा आज खरा ठरला असून काँग्रेसने मालेगावमधील वचपा परभणीमध्ये काढत राष्ट्रवादी काँग्रेसचा चोख हिशोब केला आहे.
परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या २० नगरसेवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तसेच नांदेड, औरंगाबादमधीलही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान तालुका अध्यक्ष, शहराध्यक्ष अशा महत्वपूर्ण पदाधिकाऱ्यांचा आणि विविध ठिकाणच्या भाजपच कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश पार पडला आहे. मुंबईतील टिळक भवन येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा झाला. या प्रवेशामागे खरा चेहरा कॉंग्रेसचे सचिव सुरेश कुंडलिकराव नागरे यांचा असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे.
Discussion about this post