व्हीएसआरएस न्युज करोनाबाधित रुग्णांवर उपचार केल्यानंतर आकारण्यात येणाऱ्या वैद्यकीय बिलांचे शासन निर्णयानुसार पुर्वलेखापरिक्षण केले जाणार आहे. शासनाने दिलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक असून, नियमांचे उल्लंघन होणार नाही याबाबत खासगी रुग्णालयांनी दक्षता घ्यावी अशी सूचना महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी केली.
करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने नुकत्याच जारी केलेल्या अधिसूचनेनुसार खासगी रुग्णालयांनी आकारलेल्या वैद्यकीय बिलांची तपासणी करण्यासाठी महापालिका पातळीवर पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.
पथकाबरोबर शहरातील खासगी रुग्णालयांचा समन्वय ठेवण्यासाठी शहरातील खासगी रुग्णालयांचे डॉक्टर व संचालकांच्या समवेत नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली होती. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, मुख्य लेखापरिक्षक अमोद कुंभोजकर, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी ढगे, डॉ. शैलजा भावसार, डॉ. सुजाता साळवे, बील पडताळणी समिती प्रमुख तथा सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, उपअभियंता विजय भोजने आदी उपस्थित होते.
या वेळी आयुक्त राजेश पाटील म्हणाले की, करोना महामारीमध्ये अनेकांना आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागले आहे. अनेकांना मानसिक, शारीरिक त्रास सोसावा लागला. अशा वेळी मानवी संवेदना जागृत ठेवून प्रत्येकाने सेवा दिली पाहिजे. लोकभावना समजून घेण्याची नितांत गरज आहे. रुग्ण दगावल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देताना बिलाकरीता अडवणूक करणे योग्य नाही. करोना रुग्णांवरील उपचारांचे दर शासनाने निश्चित करुन दिले आहेत. यादराप्रमाणे रुग्णालयाने आकारणी करुन बील दिले पाहिजे. बिलांबाबत वाढणाऱ्या तक्रारी उद्भवू नयेत यासाठी बीलांचे ‘प्री ऑडिट’ करण्यात येणार आहे.
त्यामुळे संबंधित रुग्णालयाने वेळेत बील तयार करावे, ते एकत्रित बील असावे. योग्य कारणासाठी रुग्णालयांना आवश्यक असल्यास महापालिकेचे सहकार्य असेल. महापालिका प्रशासनाला लेखापरिक्षणाबाबत रुग्णालयाने सहकार्य करावे, असेही आयुक्त पाटील यांनी सांगितले.