व्हीएसआरएस मराठी न्युज –पिंपरी चिंचवड परिसरातील तळवडे येथील कारखान्यात झालेल्या आग दुर्घटनेतील जखमी रुग्ण सुमन गोधडे (वय ४० वर्षे) यांचे रात्री दोन वाजता ससून रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान आज निधन झाले. ही अत्यंत दु:खद घटना असुन कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, अशा शब्दांत आयुक्त शेखर सिंह यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
तळवडे येथील एका कारखान्यामध्ये दि. ८ डिसेंबर रोजी घडलेल्या आग दुर्घटनेत ६ जणांचा घटनास्थळी मृत्यू झाला होता तर १० जण जखमी झाले होते. जखमींना पुढील उपचारांसाठी तातडीने पुणे येथील ससून रुग्णालयात पाठविण्यात आले होते. त्यातील प्रतिक्षा तोरणे (वय १६ वर्षे) आणि कविता राठोड (वय ४५ वर्षे) यांचे दि.९ डिसेंबर रोजी तर शिल्पा राठोड (वय ३१ वर्षे) यांचे दि. १० डिसेंबर रोजी ससून रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. तर प्रियंका यादव (वय ३२ वर्षे) आणि अपेक्षा तोरणे (वय १८ वर्षे) यांचे दि.१४ डिसेंबर रोजी उपचारादरम्यान निधन झाले. आज आणखी एक जखमी महिलेचे निधन झाल्याने तळवडे आग दुर्घटनेतील आतापर्यंतच्या मृतांची संख्या १२ इतकी झाली आहे.
महापालिकेने आगीमुळे होणाऱ्या दुखापतींच्या समस्येकडे लक्ष देण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल उचलले असून जळीत कक्षाद्वारे पीडितांना उपचार, विशेष काळजी आणि त्यांना शारीरिक आणि मानसिक आघातातून सावरण्यासाठी मार्गदर्शन देण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय विभागाने दिली आहे.
Discussion about this post