व्हीएसआरएस मराठी न्युज –शहरातील थकीत मालमत्ता धारकांचे नळजोड तोडण्याची कायद्यात तुरतूद आहे. त्यामुळे जे मालमत्ताधारक कर भरणार नाहीत, त्यांचे नळजोड तोडण्यात येत आहे. मात्र, एखाद्या सोसायटीतील काही लोकांनी कर भरला असेल तर संपूर्ण सोसायटीचे नळजोड न तोडता फक्त कर न भरणाऱ्यांचे पाणी कसे तोडता येईल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी गुरूवार (दि.12) रोजी पत्रकार परिषदेत सांगितले.
शहरात 5 लाख 90 हजार निवासी व बिगरनिवासी मिळकतींची नोंद महापालिकेकडे आहे. आतापर्यंत 565 कोटी रुपये मिळकतकराचा भरणा झाला आहे. 1 लाख 62 हजार निवासी मिळकतधारकांकडून अनधिकृत बांधकाम शास्तीकर वगळून मूळ मिळकतकरांची 480 कोटींची थकबाकी आहे. ही थकबाकी वसुल करण्यासाठी कर आकारणी व कर संकलन विभागाच्या वतीने जप्ती मोहीमेसह, नळजोड तोडण्याचीही कार्यवाही करण्यात येत आहे.
महापालिकेत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला आरोग्य विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर, रविकिरण घोडके, विशेष कार्यकारी अधिकारी किरण गायकवाड आदी उपस्थित होते.
Discussion about this post