Pimpri News : पिंपरी : पिंपरी चिंचवडचे माजी महापौर आणि राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी आज दि. २५ डिसेंबर रोजी शिवसेनेचे पक्षप्र्मुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यामुळे पिंपरी चिंचवडमधील राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
वाघेरे यांची ही भेट येती लोकसभा निवडणूक नजरेसमोर ठेवून होती. तसे संकेत त्यांनी दिले आहेत. आपण मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असून मागील निवडणुकीच्यावेळी आपण तयारीही केली होती असे त्यांनी म्हटले आहे. मी अद्याप शिवसेनेत प्रवेश केला नाही. उद्धवजी माझ्या उमेदवारीसंदर्भात पक्षातील नेत्यांशी, पदाधिकार्यांशी चर्चा करतील. आणि; नंतर मला कळवतील त्यानंतर मी माझी भूमिका स्पष्ट करेन असे वाघेरे यांनी म्हटले आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा यासाठी राष्ट्रवादीचे स्थानिक नेते आग्रही आहेत. तर दुसरीकडे शिंदेगटाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी या मतदारसंघातून मीच युतीचा उमेदवार असणार असे जाहीर करून त्यादृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार मावळातून पुन्हा निवडणूक लढवणार का? की या जागेसाठी आग्रही असणारे आमदार सुनील शेळके पुढे सरसावणा? अशा चर्चा सुरू असतानाच वाघेरे यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे मावळमधील युतीच्या उमेदवाराचा तिढा सहजासहजी सुटणार नाही असे आता दिसू लागले आहे.
Discussion about this post