पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हेशाखा युनिट २ ने जुनी सांगवी परिसरात झालेल्या घरफोडीचा तपास करून एका सराईत घरफोड्याला जेरबंद केले आहे. त्याच्याकडून १३ लाख रुपये किमतीचे २० तोळे सोन्याचे दागिने आणि १० हजार रुपये रोख असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेला आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर ७० पेक्षा अधिक घरफोडी, चोरीचे गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी चोरीचे दागिने विकण्याचे काम करणारी आरोपीची पत्नी आणि हे दागिने विकत घेणारा सोनार यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयवंत ऊर्फ जयडया गोवर्धन गायकवाड वय ३८ रा. स्टार आहुरा सोसायटी आंबेगाव पुणे, असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. तर, गौरवकुमार शामसुंदर विजयवर्गीय वय ३६ रा. आंबेगाव पुणे असे दागिने विकत घेणार्या सराफाचे नाव आहे. दागिने विकण्यासाठी आरोपीची पत्नी विद्या जयवंत ऊर्फ जयडया गोवर्धन गायकवाड रा. आंबेगाव पुणे ही मदत करत असे. या तिघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक ०२ डिसेंबर २०२३ रोजी रात्री सांगवी पोलीस स्टेशन हद्दीमधील फिर्यादी सौ. स्मिता अमोल बोत्रे राहणार श्री हाईटस, जुनी सांगवी, यांच्या फ्लॅटमधील लोखंडी कपाट फोडून सुमारे २०.३५ तोळे सोन्याचे दागिने व रोख दहा रुपये असा सुमारे आठ लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरुन नेला होता. गुन्हे शाखा युनिट २ कडून गुन्हयाचा समांतर करीत असतांना सीसीटीव्ही फुटेजवरुन हा गुन्हा सराईत गुन्हेगार जयवंत ऊर्फ जयडया गोवर्धन गायकवाड रा. आंबेगाव पुणे याने केल्याचे निष्पन्न झाले.
तो चिंचवड स्मशानभूमि येथे आला असता पोलिसांनी त्याला पकडले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
ही कारवाई गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम,उप निरीक्षक गणेश माने,अंमलदार देवा राऊत, जयवंत राऊत, प्रमोद वेताळ, आतिष कुडके, उषा दळे, शिवाजी मुंढे, नामदेव कापसे, उध्दव खेडकर, अजित सानप, जमीर तांबोळी, दिलीप चौधरी यांनी केली.
Discussion about this post