Pimpri News : पिंपरी : मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे कूच करत असलेली मराठा आरक्षण पदयात्रा २४ जानेवारी रोजी रात्री उशिरा पिंपरी चिंचवड शहरात दाखल झाली. शहरात पदयात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. नियोजित कार्यक्रमानुसार पिंपरी चिंचवडमध्ये दुपारी १२ वाजता ही पदयात्रा दाखल होणार होती मात्र, प्रत्यक्षात ती रात्री उशिरा शहरात प्रवेश करती झाली.
पदयात्रेचे शहरात जंगी स्वागत करण्यात आले.फुलांची उधळण करण्यात आली. मनोज जरांगे यांना क्रेनच्या सहाय्याने भलामोठा पुष्पहार घालण्यात आला.
जगताप डेअरी, डांगे चौक, चापेकर चौक, चिंचवड स्टेशन, खंडोबामाळ चौक, टिळक चौक भक्ती-शक्ती, देहूरोड, तळेगावदाभाडे मार्गे पदयात्रा मध्यरात्री लोणावळ्याकडे रवाना झाली. या दरम्यान भक्तीशक्ती येथे जरांगे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या शिल्पाला वंदन केले.
शहरात ठिकठिकाणी पदयात्रेचे स्वागत करण्यात आले. पदयात्रेतील लोकांसाठी ठिकठिकाणी अल्पोपहार, भोजनाचीही व्यवस्था अनेकांनी केली होती.
वाहतुकीत बदल; नागरिकांची गैरसोय
पदयात्रा दुपारी १२ वाजता शहरात पोहोचणार असे गृहीत धरून पोलिसांनी सकाळी सहा वाजल्यापासून शहरात अनेक ठिकाणी वाहतूक अन्यत्र वळविली होती. याचा परिणाम विशेषकरून पीएमपीएमएल च्या बस सेवेवर झाला. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली.
कडेकोट बंदोबस्त
पदयात्रा शहरातून मुंबईकडे जाताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पिंपरी-चिंचवड पाेलीस आयुक्तालयाने एका अतिरिक्त आयुक्ताच्या नियंत्रणाखाली, सहा उपायुक्त, १२ सहायक आयुक्त, ६० निरीक्षक, १०० सहायक निरीक्षक असे १ हजार २०० पाेलीस बंदोबस्त करत हाेते.
Discussion about this post