Pune News : पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरात मोठी दहशत असलेला कुख्यात गुंड गजानन मारणे याने नुकतीच विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांची सपत्निक भेट घेतली. याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय बनला आहे.त्याचबरोबर भाजपच्या साधनशुचितेचे आता काय होणार अशीही चर्चा सुरू झाली आहे.
गजानन मारणे बरोबरच जयश्री मारणे या त्याच्या सौभाग्यवती, पुण्याच्या राजकीय वर्तुळात स्वतःचे स्थान असलेले दीपक मानकर, दत्ता धनकवडे, प्रदीप देशमुख हे स्थानिक नेतेही उपस्थित होते अशी माहिती मिळत आहे.
छायाचित्रात मारणे पार्थ पवार यांना श्रीफळ देताना दिसत असून त्यावरून ही सदिच्छा भेट असावी. येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मारणे दाम्पत्य अजित पवार गटात प्रवेश करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला असून तसे घडले तर कोथरूड परिसरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
गजानन मारणे याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण,खंडणी घेणे, दहशत माजविणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. मात्र, जयश्री मारणे या पुणे महापालिकेत मनसेच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेविका होत्या.
Discussion about this post