Pimpri News : पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेने मल्टीस्पेशालिटी बर्न हॉस्पिटल आणि रुग्णालयात बर्न वॉर्ड तयार करावेत अशी मागणी पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधीपक्ष नेता नाना काटे यांनी पालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
दि. ८ डिसेंबर रोजी तळवडे येथे स्पार्कल्स बनविणा-या कारखान्यात स्फोट झाला होता. या स्फोटात ६ महिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर उपचारादरम्यान आजवर ३ महिलांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या ९ झाली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या एकाही रुग्णालयात बर्न वॉर्ड नसल्यामुळे या रुग्णांवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.त्या अनुषंगाने काटे यांनी दि. ११ डिसेंबर रोजी सिंह यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, तळवडे औद्योगिक परिसरातील फायर कॅन्डल बनवणा-या कारखान्यामध्ये स्फोट होऊन कंपनीतील ७ निष्पाप कामगारांना आपला जीव गमवावा लागला व काही कामगार गंभीररित्या जखमी झाले असून वेळेत उपचार न मिळाल्यामुळे अधिक २ कामगारांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून मृतांची संख्या ९ वर गेली आहे, शहरात असे अपघात झाल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आपल्या पिंपरी चिंचवड शहरात महापालिकेचे एकही बर्न हॉस्पिटल किवा महापालिकेच्या रुग्णालयात बर्न वॉर्ड ही सुविधा उपलब्ध नाही ही खूप खेदाची आणि गंभीर बाब असून, शहरात अशा घटना घडल्यास या जखमी रुग्णांवर उपचार करण्यसाठी पुण्यातील ससून रुग्णालय किंवा अन्यत्र शहरात खासगी रुग्णालयात जावे लागते, त्यामुळे अशा दुर्घटनेतील रुग्णांना वेळेत उपचार न मिळाल्याने नागरिकांचे बळी देखील जात आहेत. नमूद केलेल्या बाबी या अतिशय गंभीर असून त्यांचा विचार करता लवकरात लवकर प्रशासकीयस्तरावर निर्णय घेऊन पिंपरी चिंचवड शहरात अत्याधुनिक मल्टीस्पेशालिटी बर्न हॉस्पिटल व महापालिकेच्या रुग्णालयात त्वरित बर्न वॉर्ड तयार करण्यात यावे.
Discussion about this post