Pimpri News : पिंपरी : रावेत येथील एका सोसायटीमध्ये साफसफाईचे काम करणा-या महिलेकडे त्याच सोसायटीत प्लंबिंगचे काम करणा-या व्यक्तीने प्रेमसंबंध ठेवण्याची मागणी केली. तिने नकार देताच त्याने तिचा गळा आवळून खून केला. हा प्रकार बुधवारी घटला.पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.
याप्रकरणी प्रमोद रामेश्वर यादव (वय 34) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरिफ झुल्फिकार मल्लीक (वय 21, रा. मोशी) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार प्रमोद यादव आणि त्यांची पत्नी रावेत येथे फेलिसीटी सोसायटीत साफसफाईचे काम करत होते. ते रहावयासही तेथेच होते. आरोपी त्या सोसायटीत प्लंबिंगचे काम करत होता.
बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता यादव यांची पत्नी कामावर गेली. ती सोसायटीच्या क्लबहाऊसमध्ये काम करत असताना आरोपीने तिच्याकडे मोबाईल नंबरची मागणी केली. तसेच प्रेमसंबंध ठेवण्याचीही मागणी केली. फिर्यादीच्या पत्नीने त्याला विरोध केला. आणि हा प्रकार आपल्या पतीच्या कानावर घालणार असल्याचे आरोपीला सांगितले.त्यानंतर आरोपीने फिर्यादीच्या पत्नीचा गळा आवळून तिचा खून केला. हा प्रकार सायंकाळी साडेसहाच्या सुमारास उघडकीस आला.
पोलिसांनी तपास करून आरोपीला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली.
रावेत पोलीस पुढील तपास करत आहेत.
Discussion about this post