Pimpri News : पिंपरी : हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवडमधील उपयोगकर्ता शुल्क, इंद्रायणी-पवना नदी प्रदूषण, भूसंपादन प्रक्रिया, बर्न हॉस्पिटल अशा विविध मुद्यांवर आमदार महेश लांडगे यांनी राज्य सरकारचे लक्ष वेधले. या मुद्यांवर सभागृहात सकारात्मक चर्चा झाली.
राज्य विधीमंडळाच्या दहा दिवसांच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले. त्यात पिंपरी-चिंचवड शहरातील विविध प्रश्न आणि मुद्यांवर घमासान चर्चा झाली. राज्यातील परिस्थितीमध्ये झालेला बदल आणि महापालिकेतील प्रशासकीय राजवट यामुळे विविध मुद्यांवर जोरदार चर्चा झाली. त्यामुळे हिवाळी अधिवेशन पिंपरी-चिंचवडकरांसाठी फलदायी ठरले आहे. शहरातील १० ते १२ विषयांवर लक्षवेधी चर्चा, तारांकीत प्रश्न, औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र, दहा दिवसांच्या अधिवेशनामध्ये काही प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. त्यावर आगामी अधिवेशनात पाठपुरावा करण्यात येणार आहे.
आमदार महेश लांडगे यांनी उपयोगकर्ता शुल्क वसुली रद्द करण्याबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत उपयोगकर्ता शुल्क वसुलीला स्थगिती देण्यात आली. इंद्रायणी व पवना नदी प्रदूषणावरही सभागृहात सकारात्मक चर्चा झाली. केंद्र सरकारच्या अमृत- २ योजनेमध्ये या नदी सुधार प्रकल्पाचा समावेश करण्यात आला.
भोसरी विधानसभा मतदार संघातील समाविष्ट गावांमध्ये रस्त्यांच्या जाळे निर्माण करण्यासाठी भूसंपादन प्रक्रियेचा अडसर होत आहे, असा दावा आमदार लांडगे यांनी सभागृहात केला. त्यावरही राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतली. कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी भूसंपादन प्रक्रिया सुलभ करण्याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
Discussion about this post