व्हीएसआरएस मराठी न्युज –पिंपरी: अमृत योजनेअंतर्गंत निगडी विभागातील से.२२ मधील ड्रेनेज लाईनच्या कामास मंजुरी मिळाली होती. मंजुरी मिळून देखील काम सुरू न करता नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार ठेकेदाराकडून सुरु आहे.
त्यामुळे या तक्रारीची दखल घेऊन सदर ठेकेदारास काळ्या यादीत टाकून त्याने भरलेली अनामत रक्कम जप्त करून कडक कारवाई करण्यात यावी, तसेच या कामासाठी अन्य ठेकेदाराची नियुक्ती करून रखडलेल्या ड्रेनेज लाईनच्या कामास तात्काळ सुरूवात करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे.
याबाबत दिपक खैरनार यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अमृत योजनेअंतर्गंत केंद्र सरकार आणि राज्य सरकारमार्फत महापालिकेच्या विविध प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये अमृत योजनेंतर्गत विकासकामे सुरू आहेत. राज्यातील महापालिकांमध्ये ही योजना सुरू असून, त्यासाठी राज्य शासन दरवर्षी प्रोत्साहनपर निधी देते. याच योजने अंतर्गत दि.०६ डिसेंबर,२०२२ रोजी एस.एम.सी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.ली (ठाणे) या संस्थेस कामाचा आदेश देण्यात आला होता. या आदेशानुसार निगडी विभागातील से.२२ मधील ड्रेनेज लाईन टाकण्याबाबत नमुद असून यात ‘एकता चौक ते अंकुश चौक,संजय हॅाटेल ते अंकुश चौक व अंकुश चौक ते नाला’ असे कामाचे स्वरूप आहे. या विभागातील ड्रेनेज लाईनची समस्या पाहता ठेकेदारास ‘कामाचा आदेश’ मिळाल्यानंतर सदरील काम हे तात्काळ सुरु करणे गरजेचे होते. नागरिकांनी अनेवेळा तक्रारी करून देखील ड्रेनेज कामाची स्थिती ‘जैसे थे’ अशीच आहे. यामुळे से.२२ मधील ड्रेनेज व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत.महापालिका प्रशासनाचे ठेकेदारावर नियंत्रण आहे की नाही असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील अमृत योजनेंतर्गत सुरू असलेले काम हे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर राज्याचे तात्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेला अमृत योजने अंतर्गत येणारी कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. परंतू याचे ठेकेदारास गांभिर्य नसल्याचे दिसून येत आहे. तसेच पिंपरी महापालिकेचा ड्रेनेज विभाग या ठेकेदारास पाठीशी घालत आहेत. ठेकेदारावर प्रशासनाचा वचक राहिलेला नाही. त्यामुळे स्वतः आयुक्तांनी यात लक्ष घालून दोषी असणारे ड्रेनेज विभागातील सह शहर अभियंता, कार्यकारी अभियंता तसेच ठेकेदारावर कडक कारवाई करून त्याने भरलेली अनामत रक्कम, सुरक्षा रक्कम व बयाना रक्कम जप्त करावी तसेच ड्रेनेज लाईनचे काम तात्काळ पुर्ण करण्या संदर्भात संबंधित यंत्रणेला आदेश द्यावेत,अन्यथा नाईलाजास्तव तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिपक खैरनार यांनी दिला आहे.
Discussion about this post