व्हीएसआरएस मराठी न्युज –
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेत राज्य सेवेतील दोन अतिरिक्त आयुक्त प्रतिनियुक्तीवर कार्यरत असताना आता तिसरे अतिरिक्त आयुक्तही राज्य सेवेतीलच आले आहेत.
अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांची पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी राज्य सरकारने नियुक्ती केली. थोरवे यांनी महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह साताऱ्याचे जिल्हाधिकारी असताना त्यांच्यासोबत काम केले आहे. त्यामुळे आयुक्तांनी शिफारस करुन मर्जीतील अधिकारी आणल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.
महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह हे साताऱ्याचे जिल्हाधिकारी असताना थोरवे हे साताऱ्याचे निवासी उपजिल्हाधिकारी होते. सिंह यांच्यासोबत त्यांनी काम केले. त्यामुळे सिंह यांनीच शिफारस करुन थोरवे यांना पालिकेत आणल्याचे बोलले जात आहे. आपल्या मर्जीतील अधिकारी सिंह यांनी आणल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. थोरवे यांनी खेड, मावळचे प्रांत अधिकारी म्हणून काम केले. यापूर्वी पिंपरी महापालिकेतही सहाय्यक आयुक्त म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
शहर अभियंता मकरंद निकम यांना गेल्या सहा महिन्यांपुर्वीच या पदावर पदोन्नती मिळालेली आहे. तर; आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांना १५ दिवसांपुर्वी या पदावर पदोन्नती मिळालेली आहे. उपायुक्त आशा दुर्गुडे, चंद्रकांत इंदलकर व संदीप खोत यांना या पदावर पदोन्नती मिळून दीड ते दोन वर्षेच झालेले आहेत. तर; नगरसचिव पदावरील उल्हास जगताप यांची या पदावर ९ वर्षे सेवा झालेली आहे. राज्य सरकारच्या अध्यादेशानुसार ९० टक्के सेवा झालेली असेल तरी तो अधिकारी महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तांच्या पदोन्नतीसाठी पात्र ठरु शकतो. त्यामुळे जगताप या पदासाठी पात्र असून त्यांनी त्यानुसार महापालिका आयुक्त व राज्य सरकारकडे रितसर अर्ज केलेला असल्याचे खात्रीलायकरित्या समजते.
राज्य शासनाने पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी सुनिल थोरवे यांची नियुक्ती केली आहे. थोरवे यांनी पालिकेत तत्काळ रुजू व्हावे असे आदेशात म्हटले आहे. याबाबतचा आदेश 18 नोव्हेंबर 2022 रोजी महसूल विभागाचे सह सचिव डॉ. माधव वीर यांनी काढला आहे.
Discussion about this post