Pune News : पुणे : पुणे शहर पोलिसांनी २० फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील कुरकुंभ एम.आय.डी.सी. मध्ये अर्थकेम कंपनीवर छापा घालून सुमारे ११०० कोटी रुपयांचा ६०० किलोपेक्षाअधिक मेफेड्रोन नावाचा अमलीपदार्थ जप्त केला.
यासंदर्भात पोलीसआयुक्त अमितेशकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रासह अन्य राज्यात आणि विदेशातही पसरलेली आहेत.या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सर्वत्र पथके रवाना करण्यात आली असून केंद्रीय अमलीपदार्थ प्रतिबंधक यंत्रेणेचेही सहाय्य या तपासकामी घेतले जाणार आहे.
काल २० फेब्रुवारी रोजी दुपारी पुणे शहर पोलिसांच्या १० गाड्यांचा ताफा कुरकुंभ एम. आय. डी. सी. येथे अर्थकेम या कंपनीसमोर दाखल झाला. त्यांच्या सोबत रसायन विषयक तज्ज्ञही होते. त्यांनी तपासणी केल्यानंतर सुमारे ६०० किलोपेक्षाही अधिक मेफेड्रोन तेथे आढळून आले. हे मेफेड्रोन पॉल आणि ब्राऊन या दोन विदेशी नागरिकांपर्यंत मुंबई येथे पोहोचविण्यात येणार होते. अर्थकेम ही कंपनी अहमदनगर जिल्ह्यातील अनिल साबळे या व्यक्तीच्या मालकीची असून त्याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
दोन दिवसांपूर्वी पुणे शहरात वैभव ऊर्फ पिंट्या भारत माने (रा. पुणे), अजय अमरनाथ करोसिया (वय ३५ वर्ष, रा. पुणे) आणि हैदर शेख (रा.विश्रांतवाडी) यांना तिघांना अटक करून त्यांच्याकडून ५ कोटींचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. या पैकी हैदर शेख याच्या ताब्यात असलेल्या गोदामातून कालच १०० कोटी रुपयांचे ५२ किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. त्या पाठोपाठ कुरकुंभ येथे घातलेल्या या छाप्यात मोठ्याप्रमाणात मेफेड्रोन सापडले.
यामुळे पुणे हे अमलीपदार्थ तस्करांचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील केंद्र बनले असल्याचे उघड झाले आहे. या रासायनिक प्रक्रियेद्वारे तयार केल्याजाणार्या अमलीपदार्थांबरोबरच गांजासारखे एतद्देशीय अमलीपदार्थही शहरात सर्रास आणि मुबलकपणे मिळत असल्याची चर्चा आहे. शाळा, कॉलेजमधील तरुण याला बळी पडत आहेत. पोलिसांनी शाळा, कॉलेज बाहेर टेहळणी करून त्या अमलीपदार्थांनाही आळा घालण्याची गरज आहे.
पुणे पोलिसांच्या पथकांनी दिल्लीत दोन ठिकाणी छापे घालून अनुक्रमे ६०० आणि १२०० किलोग्राम मेफेड्रोन जप्त केले आहे. दिल्लीतील हौजखास या उच्चभ्रू परिसरात पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अद्यापही पुणे आणि दिल्ली पोलिसांची संयुक्त छापेमारी काही ठिकाणी सुरू असल्याचे समजते.
Discussion about this post