भामा आसखेड |(व्हीएसआरएस न्यूज) | ’गाव वाचवा, शेती वाचवा’ असा संदेश ग्रामस्थांनी एकमुखी दिला. दि. 26 जानेवारी रोजी कुरकुंडी ग्रामपंचायतीची ग्रामसभा ग्रामपंचायत सभागृहात सरपंच सागर जावळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. ग्रामसभेत खडी मशीन सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी म्हणून गावातील पाच व्यक्तींचे अर्ज ग्रामसेवकांकडे आले होते. खेड तालुक्यातील कुरकुंडी गावामध्ये खडी मशीन सुरू करण्यासाठी पाच व्यक्तींच्या अर्जाला ग्रामसभेत ग्रामस्थांनी एकत्रितपणे प्रखर विरोध दर्शविल्याने हे अर्ज फेटाळण्यात आले. यापुढे खडी मशीनचा एकही अर्ज न स्वीकारण्याचा एकमुखी ठरावदेखील करण्यात आला. याअर्जाला विरोध करायचा आणि अर्ज ग्रामसभेत फेटाळून लावायचे हा संदेश देण्यात आल्याने गावातील महिला मोठ्या संख्येने ग्रामसभेला हजर झाल्या. ग्रामसभेत कसलीही गडबड, गोंधळ होऊ नये म्हणून पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला होता. पोलिसांच्या उपस्थितीत ग्रामसभा सुरू करून शांततेत पार पडली.
प्रचंड गदारोळात गावातील ज्येष्ठ नागरिक, तरुण व उपस्थित महिलावर्गाने नावानिशी सह्यांची मोहीम राबवून खडी मशीनला प्रखर विरोध केला. ग्रामसभेला शंभराहून अधिक ग्रामस्थ सहभागी होते. खडी मशीन सुरू करण्याबाबत आलेल्या अर्जांचे वाचन ग्रामसेविका सुनीता चौधरी यांनी केले. खडी मशीन विषयाने ग्रामसभेत प्रचंड गोंधळ झाला तसेच ज्यांचा खडी मशिनला विरोध आहे त्यांनी हात वर करावा, अशी सूचना केल्यावर उपस्थितांपैकी जवळपास 90 टक्के लोकांनी हात वर करून विरोध दर्शविला. कुरकुंडी ग्रामसभेत बहुमताने खडी मशिनला विरोध झाल्याने पाचही अर्ज फेटाळून लावले आणि इथून पुढे कधीही कुणाचेही खडी मशीनचे अर्ज कायमस्वरूपी स्वीकारणार नाही, असे ग्रामसभेच्या इतिवृत्तामध्ये नमूद करण्यात आले. गावकर्यांनो, ”गाव वाचवा, शेती वाचवा” असा ग्रामस्थांचा आवाज ग्रामसभेत एकमुखी घुमला.
ग्रामसभेला सरपंच सागर जावळे, उपसरपंच काळूराम राळे, ग्रामपंचायत सदस्य नितिन भोकसे, गणेश काळे, रंजना भोकसे, दीपाली हाबडे, सविता ढोरे, सारिका भोकसे, सविता पडवळ, रणजित भोकसे आदीसह ग्रामपंचायतीचे व विकास सोसायटीचे आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामसभा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल सरपंच जावळे व उपसरपंच राळे यांनी आभार मानले. ग्रामसभेचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात आले.
Discussion about this post