व्हीएसआरएस न्युज पिंपरी- पिंपरी : पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर झालेल्या कथित गोळीबार प्रकरणात एक वेगळीच माहिती समोर आली आहे. अटकेत असलेल्या कंत्राटदार अँथोनी यांचे मॅनेजर तानाजी पवारने जीव वाचवण्याच्या उद्देशाने हवेत गोळीबार केल्याचा जबाब दिला आहे. आमदार अण्णा बनसोडेंनी दावा केला होता की तानाजी पवारने त्यांच्या दिशेने गोळीबार केला. मात्र, पिंपरी चिंचवड पोलिसांना गोळी लागल्याच्या खुणा अद्याप सापडलेल्या नाहीत. त्यामुळे, आमदार अण्णा बनसोडे यांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. त्यातच आता आमदार बनसोडे यांची एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. ज्यामध्ये आमदार अण्णा बनसोडे तानाजी पवारला धमकावत आहेत.
तानाजी पवार आज आमदारांना भेटायला त्यांच्या कार्यालयात आले. त्यानंतर वाद झाला. आमदारांच्या कार्यकर्त्यांनी तानाजी पवारला मारहाण करत कार्यालयाबाहेर आणलं. तेव्हा तानाजी पवारने त्याच्याकडे असणाऱ्या बंदुकीतून तीन गोळ्या झाडल्या. ह्या गोळ्या माझ्या दिशेने झाडल्याचा दावा आमदारांनी केला होता. मात्र पोलिसांना गोळीबाराच्या खुणा आढळल्या नाहीत, अशी माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली.
अटक करण्यात आलेल्या तानाजी पवारांनी सांगितले की आमदारांचे कार्यकर्ते मला बेदम मारहाण करत होते. माझा जीव जाण्याची शक्यता होती, म्हणून बचावासाठी मी हवेत गोळीबार केला. अशातच काल झालेल्या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला. यात अँथोनी यांच्या कार्यालयात आमदारांचे समर्थक आले होते. त्यांनी अँथोनी यांच्या कर्मचाऱ्यांवर शस्त्राने हल्ला केला होता. हा प्रकार गोळीबारानंतर आमदारांनी सांगितला नव्हता. त्यामुळे आता परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस कृष्ण प्रकाश यांनी दिली.
पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळी लागल्याच्या खुणा अजूनपर्यंत सापडल्या नाहीत. त्यामुळे आमदारांचा दावा फोल ठरत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. या प्रकरणात दोन्ही बाजूंची तपासणी पोलिसांकडून करण्यात येत आहे. त्यातच एक सीसीटीव्ही फुटेज व ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तानाजी पवार आणि आमदार बनसोडे यांच्यामधील ऑडिओ क्लिप समोर आली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये अण्णा बनसोडे हे तानाजी पवारला धमकावत असल्याचं स्पष्ट होत आहे. तानाजी पवार याला फोन करून तू कुठे आहे सांग, मी तिथे येतो. एवढे फोन करूनही तू फोन उचलत नाहीस, एकदा येऊन तर जा ना! असं आमदार बनसोडे म्हणतात. तानाजी पवार मी मुंबईत आहे, असं सांगून तुमचं काय काम अडलंय ते सांगा, यावर तुझा मालक आजुबाजूला आहे का असं आमदार विचारतात आणि तानाजी पवार म्हणतो मी माझ्या वैयक्तिक कामासाठी मुंबईत आलोय. त्यावर आमदार साहेब तुझ्या मालकाशी बोलतो, असं उत्तर देतात आणि शिवीगाळ करायला सुरुवात करतात.
तानाजी पवार म्हणतो की, जनप्रतिनिधीला अशी भाषा शोभत नाही मी तुमच्याशी इज्जतीने बोलतोय आणि तुम्ही शिव्या देत आहे त्यावर आमदार पुन्हा शिवीगाळ करतात आणि तू उद्या ये असं म्हणतात. या ऑडिओ क्लिपमुळे सध्या एकच खळबळ माजली आहे. तर परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी सांगितलं आहे. या सर्व प्रकरणामुळे आता आमदार संशयाच्या फेऱ्यात सापडल्याचे चित्र पिंपरी-चिंचवडमध्ये पाहायला मिळत आहे.