व्हीएसआरएस न्युज निगडी-‘परिसरावर वर्चस्व कुणाचे’ या वादातून एका सराईत गुन्हेगाराने दुस-या गुन्हेगारावर गोळीबार केल्याची घटना बुधवारी (दि.25) रात्री साडे अकराच्या सुमारास निगडीतील ओटास्किम येथे घडली होती. याप्रकरणातील आरोपींची निगडी पोलिसांनी आज (शनिवारी) घटनास्थळी पायी धिंड काढली. दरम्यान, तपासानिमित्त आरोपींना घटनास्थळी नेल्याचे पोलिसांनी सांगितले.
दोडमणी आणि खवले यांच्यात परिसरात वर्चस्व कुणाचे यावरून वाद सुरु होता. या वादातून किरण खवले या सराईत गुन्हेगाराने गोळीबार केला. या गोळीबारात आकाश दोडमणी याच्या पायावर गोळी लागून तो जखमी झाला होता. तसेच, दोडमणी याचा भाऊ देखील जखमी झाला होता. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
या प्रकरणातील अटक केलेल्या चार आरोपींची आज (शनिवारी) निगडी पोलिसांनी घटनास्थळी धिंड काढली. दरम्यान, गुन्हाच्या तपासासाठी आरोपींना घटनास्थळी नेले होते. गुन्हा कसा घडला, हत्यारे कुठे ठेवली आहेत, याबाबत त्यांच्याकडून माहिती घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.