व्हीएसआरएस न्युज मुंबई-प्रतिनिधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांचे निधन झाले असल्याचे समोर आले आहे. एकनाथ गायकवाड यांना करोनाची लागण झाली होती.
त्यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरु होते. मात्र उपचारा दरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. एकनाथ गायकवाड हे राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे वडील होते.
माजी खासदार व मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांना करोनाची लागण झाल्यानंतर ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचार सुरु असतानाच बुधवारी सकाळी १० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
काँग्रेसचे मुंबईचे माजी अध्यक्ष राहिलेल्या एकनाथ गायकवाड यांनी राज्य मंत्रिमंडळात मंत्रिपद भूषविलं होतं. एकनाथ गायकवाड यांच्या निधनामुळे काँग्रेससह राजकीय क्षेत्राला खूप मोठा धक्का बसला आहे.
एकनाथ गायकवाड यांनी दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून शिवसेना नेते आणि लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांचा पराभव केला होता. दक्षिण मध्य मुंबईतून दोन वेळा ते निवडून आले होते. नंतर मात्र शिवसेनेच्या राहुल शेवाळे यांनी त्यांचा पराभव केला होता.