व्हीएसआरएस न्युज पिंपरी- पिंपरीतील व्यावसायिक आनंद उनवणे यांचे अपहरण आणि खून प्रकरणी पोलिसांनी सात आरोपींना अटक केली.
कामावरून काढलेल्या एका कर्मचाऱ्याने चार जणांच्या मदतीने एक वर्षापासून कट रचून हा गुन्हा केल्याचे समोर आले आहे. पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
उमेश सुधीर मोरे (वय २८, रा. काळेवाडी), दीपक धर्मवीर चंडालिया (वय ३४, रा. रावेत), सागर दत्तात्रय पतंगे (वय २८, रा. कटफळ, ता. बारामती), बाबू उर्फ तुळशीराम नथुराम पोकळे अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी खंडणीपोटी घेतलेले सोन्याचे दागिने कोणत्याही पावतीशिवाय खरेदी करणारे राकेश राजकुमार हेमणानी (वय २७, रा. पिंपरी), कपिल ग्यानचंद हासवाणी (वय ३०, रा. पिंपळे – सौदागर), प्रवीण हैं नवनाथ सोनवणे (वय २२, रा. मदनवाडी, ता. इंदापूर) या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. तर गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार प्रभू पुजारी हा अद्याप फरारी आहे.
आनंद साहेबराव उनवणे (वय ४२, रा. नर्मदा बिल्डिंग, नवीन म्हाडा वसाहत, मोरवाडी) असे अपहरण व खून झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. उनवणे यांचा पिंपरीत एफ.एफ. आय चीटफंड या नावाने व्यवसाय होता. ते कंपनीचे कार्यकारी संचालक होते. आरोपी प्रभू पुजारी हा उनवणे यांच्या चिटफंड कंपनीत मुख्य रिकव्हरी एजंट म्हणून काम करत होता. त्याच्या वर्तणुकीवरून उनवणे यांनी त्याला एक वर्षापूर्वी कामावरून काढले होते. त्याचा राग पुजारी याच्या मनात होता. त्यावरून त्याने उनावणे
यांना मारण्याचा तसेच त्यांच्याकडून मिळेल तेवढे पैसे उकळण्याचा कट रचला. त्याने अन्य चार आरोपींना सोबत घेऊन एक वर्षापासून हा कट रचला जात होता.
३ फेब्रुवारीला रात्री उनवणे यांचे राहत्या घरापासून पाच जणांनी अपहरण केले. त्यांच्याकडून ४० लाखाची खंडणी उकळल्यानंतर महाड येथे नेऊन प्रवासादरम्यान आरोपींनी मोटारीत उनवणे यांचा दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर उनवणे यांचा मृतदेह दगडाने ठेचून महाड येथील सावित्री नदीच्या पुलावरून फेकून दिला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर या गुन्ह्याच्या तपासाकरिता पिंपरी चिंचवड पोलिसांनी सहा पथके तयार केली.
तसेच गुन्हे शाखा युनिट दोनचेही पथक समांतर तपास करत होते. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दीपक चंडालिया याला हरियाणा येथून अटक केली. त्यानंतर इतर आरोपींना जेरबंद केले. गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी परिसरातील दोन हजार सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यातून पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. आरोपींकडून ३९ लाख ५ हजार ६७८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.