व्हीएसआरएस न्युज पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उपमहापौर केशव घोळवे यांनी गत आठवड्यात वैयक्तिक कारणावरून तडकाफडकी राजीनामा दिला होता. हा राजीनामा महापौर माई ढोरे यांनी स्वीकारल्यानंतर हे पद रिक्त झाले आहे.
तत्कालीन उपमहापौर तुषार हिंगे यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपांतर्गत अलिखित जागा वाटपानुसार उपमहापौरपद हे भोसरीतील नगरसेवकाला मिळणे अपेक्षित असताना निष्ठावंत गटाने केशव घोळवे यांना उपमहापौर करण्यात यश मिळविले होते.
या पदावर नियुक्ती करताना घोळवे यांची केवळ पाच महिन्यांसाठी नियुक्ती करण्यात आल्याचे भाजपाच्या अंतर्गत सूत्रांनी सांगितले होते. त्यानुसार पाच महिन्यांचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर घोळवे यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या या पदासाठी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
विभागीय आयुक्तांनी जाहीर केल्याप्रमाणे मंगळवार दि. 23 मार्च रोजी ही निवडणूक होईल. महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी 11 वाजता विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेमध्ये उपमहापौरांची निवड होईल.