व्हीएसआरएस न्युज -वालचंदनगर (जि. पुणे) : इंदापूर तालुक्यातील जंक्शन येथील एका कार्यक्रमात बोलताना तोंडावरील मास्क निघाला; म्हणून राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी लासुर्णे ग्रामपंचायतीकडे विना मास्कचा 100 रुपयांचा दंड भरला.
आपणच दंड नाही भरला तर तोच पायंडा तालुक्यात पडेल आणि कोरोनाच्या काळात जनतेने जबाबदारीने मास्कचा वापर करावा, या उद्देशाने भरणे यांनी हे पाऊल उचलले. तालुक्यातील जनतेनेही हा धडा घेऊन मास्क वापरण्याची गरज आहे.
राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते जंक्शनमध्ये रविवारी (ता. 1 नोव्हेंबर) एका दुकानाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी अनेक नागरिक विनामास्क कार्यक्रमात सहभागी झाले होते. या वेळी भरणे यांनी नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन करून सरकारच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या. पण, भाषण सुरू असतानाच भरणे यांचा मास्क खाली सटकला होता. भाषणानंतर भरणे यांनी स्वत:हून विनामास्कचा शंभर रुपयांचा दंड लासुर्णे ग्रामपंचायतीकडे भरला.