व्हीएसआरएस न्युज पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असून रोजच धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे.
बाधितांचा आकडा 1 लाख 55 हजार 984 इतका झाला आहे. तर गेल्या 24 तासांत 17 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
सोमवारी प्रतिक्षेत असलेल्या रुग्णांचा अहवाल आज (मंगळवारी) महापालिकेला प्राप्त झाला. आजच्या अहवालानुसार शहरातील 2904 जणांना करोनाची लागण झाली असून शहराबाहेरील 34 जणांचा करोना अहवाला सकारात्मक आला आहे.
तर गेल्या 24 तासांत 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमधील पंधराजण शहरातील रहिवाशी होते. तर शहराबाहेरील दोघांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील मृतांचा आकडा 2094 वर पोहोचला असून शहराबाहेरील 850 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृत्यूची संख्या 2944 इतकी झाली आहे.
गेल्या 24 तासांत मृत्यू झालेल्यांमध्ये शहरातील चिंचवड, थेरगाव, कासारवाडी, पिंपळे निलख, दापोडी, खराळवाडी, शाहूनगर, कस्पटेवस्ती, भोसरी, निगडी, सांगवी येथील पंधराजणांचा समावेश आहे. तर महापालिका हद्दीबाहेरील घोरपडी आणि धायरी येथील रहिवाशी असलेल्या दोघांचा आज दिवसभरात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत शहरातील 1 लाख 30 हजार 129 जण करोनामुक्त झाले असून शहराबाहेरील 9073 जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. आज दिवसभरात करोनाची कोणतीही लक्षणे न आढळल्यामुळे 1679 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर गेल्या दोन दिवसांतील 1752 जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. आज नव्याने संशयित असलेल्या 6514 जणांची करोना चाचणी करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी करोनाचे तब्बल 23761 उपचाराधीन रुग्ण आहेत. त्यात 3969 रुग्ण रुग्णालयात दाखल असून 19792 रुग्ण घरात राहूनच उपचार घेत आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात करोनाच्या रुग्णसंख्येचा दररोज नवीन उच्चांक होत असल्याने महापालिका आयुक्तांनी कठोर निर्णय घेतले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील सर्व दुकाने, बाजारपेठ, मॉल्स, जिम 30 एप्रिल 2021 पर्यंत बंद राहणार आहेत. सर्व उद्याने, सार्वजनिक मैदाने, क्रीडांगणेही बंद राहणार आहेत. याबाबतचा सविस्तर आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी काढला आहे.
पिंपरी-चिंचवड संपूर्ण कार्यक्षेत्रासाठी कलम 144 लागू करण्यात आले आहे. सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई आहे.
वैध कारण, परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी सर्वांना मनाई करण्यात आली आहे. वैद्यकीय आणि जीवनावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. त्यांच्या वाहतुकीला निर्बंध असणार नाहीत.
अत्यावश्यक सेवा आणि संबंधित दुकाने, रुग्णालये, निदान केंद्रे, दवाखाना, वैद्यकीय विमा कार्यालये,औषध दुकाने, फार्मास्युटिकल कंपन्या, इतर वैद्यकीय, आरोग्य सेवा, भाजी मंडई, किराणा सामान दुकाने, भाजीपाला, फळे, डेअरी, बेकरी, स्वीट मार्ट, प्रवासी बस, कॅब, रिक्षा, रेल्वे, एसटी, मालवाहतूक, ई- कॉमर्स, आयटी सेवा, सरकारी व खासगी सेवा, वृत्तपत्रे कार्यालये आणि पेट्रोल पंप तसेच खासगी संस्थाना सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याच्या अटीवर आठवड्याचे सर्व दिवस सकाळी सात ते संध्याकाळी सहा या वेळेत सुरू ठेवण्याची परवानगी असणार आहे.
काय आहे नवीन आदेशात
– सुरु असलेल्या कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांना लसीकरण अनिवार्य
– लसीकरण झाले नसल्यास 15 दिवसांसाठी ग्राह्य असलेली आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक राहणार
-फायनान्स संस्था, वकिलांची कार्यालये खुली राहतील.
-कंपनी ओळखपत्राच्या आधारे औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना ये-जा करण्यास परवानगी
-धार्मिक स्थळे, उपासनेची ठिकाणे नागरिकांसाठी पूर्ण बंद
-अत्यावश्यक सेवांच्या दुकानात सुरक्षित अंतराचे पालन बंधनकारक
-रिक्षात चालक आणि दोन प्रवाशी, टॅक्सीत चालक आणि वाहनाच्या 50 टक्के क्षमतेएवढे प्रवासी असल्यास परवानगी
-सहकारी, सरकारी, खासगी बॅंका, विद्युत पुरवठा करणाऱ्या कंपन्या, दूरसंचार सेवा देणाऱ्या संस्था, विमा, आरोग्य विषय सुविधा सुरू राहणार
-सरकारी कार्यालये 50 टक्के मनुष्यबळसह सुरू राहणार
-वीज, पाणी, बॅंकिंग आणि इतर वित्तीय सेवा संबंधित सरकारी कंपन्या, सरकारी कार्यालये पूर्ण क्षमतेसह कार्यरत राहणार
– 50 लोकांच्या उपस्थित लग्नाला परवानगी -अंत्यविधीसाठी 20 व्यक्तींना परवानगी
-रस्त्यावरील खाद्य पदार्थच्या गाडीवर पदार्थ खाण्यास मनाई, पार्सल सेवा सुरू ठेवण्यास परवानगी
– कामगारांची राहण्याची व्यवस्था असेल अशा बांधकांमाना परवानगी
– बांधकामाच्या ठिकाणी कोणालाही करोनाची लागण झाल्यास त्याला, त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना पगारी रजा मंजूर करून अलगीकरण करणे आवश्यक
– नियमांचे पालन न करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकास पहिल्यांदा दहा हजार दंड , त्यानंतर बांधकाम साईटवरील कम बंद करण्याची कारवाई
हे बंद राहणार…
सिनेमागृह, नाट्यगृह, मनोरंजन पार्क, अम्युजमेंट पार्क, स्वीमिंग पूल, जिम, क्रीडा संकुल, स्पोर्टस क्लब संपूर्णतः बंद राहील. राहण्याची सुविधा असलेल्या हॉटेलचा अविभाज्य भाग वगळता संध्याकाळी सर्व रेस्टॉरंट आणि बार बंद राहतील. हॉटेल पार्सल सुविधा सुरू राहील. सलून, ब्यूटी पार्लर, बंद राहणार, सर्व शाळा, महाविद्यालये, परीक्षेसाठी मर्यादेत शिथिल केले जातील. खासगी क्लासेस, धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी दिली जाणार नाही.
कच्चा माल म्हणून ऑक्सिजनचा निव्वळ वापर असणाऱ्या सर्व औद्योगिक प्रक्रिया 10 एप्रिलपासून बंद करण्यात येणार.