व्हीएसआरएस न्युज पिंपरी- लोकसभेतील उत्कृष्ट कामकाजाबद्दल सलग पाच वर्षे ‘संसद रत्न’ पुरस्कार मिळालेले मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना ‘संसद महारत्न पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
चेन्नई येथील प्राईम पाँईंट फाऊंडेशनच्या वतीने बारणे यांना ‘संसद महारत्न पुरस्कार’ देवून गौरविण्यात येणार आहे.
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आणि न्यायाधीश ए.के. पटनाईक यांच्या हस्ते या पुरस्काराचे उद्या (शनिवारी) दिल्लीत वितरण होणार आहे. पुरस्कार समितीचे अध्यक्ष, संसदीय कार्यमंत्री मंत्री अर्जुन मेघवाल, प्राईम पाँईंट फाऊंडेशनचे अध्यक्ष श्रीनिवासन आदी यावेळी उपस्थित असणार आहे.
संसदेतील उत्कृष्ट काम, चर्चेत सहभाग, अधिकाधिक प्रश्न मांडणे, खाजगी विधेयके, सभागृहातील उपस्थिती. मतदारसंघात विकास निधी, योजनांवर करत असलेल्या खर्चाच्या आधारावर हा पुरस्कार दिला जातो. मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना सोळाव्या लोकसभेत सलग पाच वर्ष उत्कृष्ट कामकाजाबद्दल ‘संसद रत्न’ पुरस्कार मिळाला होता. सातत्याने सलग पाच वर्षे संसदरत्न पुरस्कार मिळणा-या खासदाराला ‘संसद महारत्न’ पुरस्कार दिला जातो. खासदार बारणे यांना हा पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. त्यामुळे शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तूरा खोवला आहे.