व्हीएसआरएस न्युज पिंपरी- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील १२० विद्यमान नगरसदस्य तसेच ५ स्विकृत सदस्य असे एकुण १२५ नगरसदस्य तथा नगरसदस्या आणि त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्य विमा योजना लागु करण्यात येणार आहे.
या सदस्यांच्या कुटुंबियांमध्ये पती अथवा पत्नी तसेच २१ वर्षे वयापर्यंतच्या दोन अपत्यांचा समावेश असणार आहे. यासाठी येणा-या ६५ लाख ९८ हजार ५६० रुपये खर्चास आज स्थायी समितीने मान्यता दिली. या विषयासह तरतूद वर्गीकरण, अवलोकनाच्या विषयासह विविध विकास विषयक बाबींसाठी झालेल्या आणि येणा-या एकूण सुमारे ३५ कोटी ५८ लाख रुपये खर्चास देखील स्थायी समितीने मान्यता दिली.
महापालिका मुख्य प्रशासकीय भवनात आज स्थायी समितीची बैठक पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते.
प्रभाग क्र.८ येथील नाशिक रोड लगतच्या मार्केट यार्ड समोरील प्राधिकरणाच्या मोकळया जागेपासून सीएनजी पंपापर्यंत डाव्या बाजुच्या रस्त्याच्या कडेने आणि इतर ठिकाणी फुटपाथ कलर पेव्हींग ब्लॉक बसविण्यासाठी १ कोटी ३० लाख रुपये, प्रभाग क्र. १६ मधील
किवळे, मामुडी परिसरामध्ये तसेच रावेत परिसरामध्ये ड्रेनेज लाईन व चेंबर्सची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी ५७ लाख रुपये, अजंठानगर ते घरकुल परिसरातील जलनि:सारण व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी २५ लाख रुपये, दापोडी येथील मैलाशुध्दीकरण केंद्राची चालन देखभाल आणि दुरुस्ती करण्याकामी १ कोटी ४८ लाख रुपये, प्रभाग क्र. १७ मधील वाल्हेकरवाडी चिंचवडे नगर परिसरातील जलनि:सारण विषयक सुधारणा कामे करणे आणि उर्वरित ठिकाणी जलनिःसारण नलिका टाकण्याकामी ३१ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.
प्रभाग क्र.२१ पिंपरी मध्ये तसेच प्रभाग क्र. २२ मधील पवनानगर, विजयनगर, किनारा कॉलनी, शांती कॉलनी, काळेवाडी परिसरामध्ये ड्रेनेज लाईन आणि चेंबर्सची देखभाल दुरुस्ती तसेच इतर आकस्मितपणे उद्भवणारी जलनि:सारण विषयक कामे करण्यासाठी ४५ लाख रुपये, प्रभाग क्र.२३ मधील गावठाण, बापुजीबुवानगर परिसरात आणि प्रभाग क्र.२३ पडवळ नगर, जय मल्हार नगर, पवार नगर व इतर परिसरातील तसेच प्रभाग क्र.२७ रहाटणी मधील श्रीनगर, नखातेनगर, तापकिरनगर परिसरात रस्त्यांची दुरूस्ती बी.एम. आणि बी.सी. पध्दतीने करण्याकामी ६६ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.
प्रभाग क्र.२७ रहाटणी मधील नखातेनगर, साईसागर नगर, श्रीनगर परिसरात रस्त्यांची दुरुस्ती एम.पी.एम. पध्दतीने २२ लाख रुपये, तर टेल्को रस्त्यावरील स्थापत्य विषयक देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी ७८ लाख रुपये आणि प्रभाग क्र.२१ पिंपरी मध्ये विविध नाल्यांची दुरूस्तीची कामे ५५ लाख रुपये खर्च होणार आहेत. या खर्चास देखील स्थायी समितीने मान्यता दिली.