व्हीएसआरएस न्युज बुलडाणा, 11 मे _कधी राजूर घाटात तर कधी बोथा घाटात विविध ठिकाणी बिबट्या दिसल्याचे किस्से अध्येमध्ये ऐकायला येतात. कधी कधी त्याचे सप्रमाण फोटोही सोशल मिडीयावर बघायला मिळतात.
परंतु आजपर्यंत क्रीडा संकुल परिसरातील मागच्या डोंगरात बिबट्याची चर्चा ऐकायला मिळाली नव्हती. या भागातील मेंढी प्वाईंट टेकडी परिसरात अनेकदा अस्वल दृष्टीस पडतात. परंतु या डोंगरदर्यात बिबट्या सुद्धा आहे.. आणि एक नव्हे तर दोन-दोन ! कुतूहल निर्माण करणारी आणि तेव्हढीच चिंताजनक बातमी तेव्हा समोर आली जेव्हा बिबट्यांच्या जोडीने माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्माणाधीन घरावर हल्ला चढविला आणि त्यांच्या पाळीव कुत्र्याला जबर जख्मी केले.
गेल्या नऊ वर्षांपासून क्रीडासंकुल परिसरात कासवाच्या गतीपेक्षा धीम्या गतीने सपकाळांच्या घराचे काम सुरू आहे निसर्गाच्या कुशीत असल्याने आणी बांधकामाच्या वैशिष्ट्यपूर्ण शैली मुळे व मागे झालेल्या नाहक तक्रारींमुळे वा यां-त्या कारणांनी सतत सदर निर्माणकार्य चर्चेत असते. मागे घर वन-क्षेत्रात बांधले म्हणून घेतल्या गेलेल्या आक्षेप पश्चात उच्चस्तरीय सर्वेक्षण करून सीमांकन निश्चित करण्यात आले; तेव्हा प्लॉट पासून जंगलाची सीमा बरीच दूर गेली असली तरी आता चक्क घराच्या परिसरात जंगली जनावरांचा मुक्त संचार होऊ लागला आहे. रोही-हरीण-ससाच नव्हे तर अस्वल सुद्धा कधी नजरेत पडतात.
मात्र शनिवारी रात्री क्लायमॅक्स घडला आणि चक्क दोन बिबटे दीर्घकाळ घरात तळ ठोकून होते. एरवी कोणी ना कोणी रात्री या निर्माणाधीन घरावर मुक्कामी थांबतच असे. उन्हाळा असल्यामुळे कधी त्यांचा मुलगा, कधी भाचा,कधी त्यांचे मित्र मुक्कामी राहात. त्या दिवशी म्हणे खुद्द सपकाळ सपत्नीक मुक्कामी जाणार होते. त्यांचा लाडका कुत्रा ब्रुनो आधीच याठिकाणी रखवालीसाठी तैनात होता.. त्यामुळे एरवी मानव अस्तित्वाचा अंदाज घेत बिबट्या खालूनच परतला असावा.
मात्र त्यादिवशी वेळ 8.30 ची.. घरी कोणीच नसल्यामुळे बिबट्यांच्या जोडीने घरात प्रवेश केला.. पहिल्या मजल्यावर जिन्यावरून झेप घेतांना प्राण्यांनी घुसू नये म्हणून आडवी लावलेल्या टिनांचा खडखडाट झाला.. ब्रुनो पहिले भुंकला मग जिवांत आकांताने विव्हळला..इनमिन चार कोंबड्या गोंधळ घालू लागल्या.. म्हणून या गोंगाटाने त्यांचा सख्खाशेजारी अविनाश टेकाळे व त्यांची आई तत्परतेने मोठे टॉर्च घेऊन गच्चीवर गेले..तर मोठ्ठा बिबट्या तोंडात ब्रुनो नावाच्या लाडक्या कुत्र्याची मान आपल्या जबड्यात पकडून डौलात परतीचा रस्ता शोधत होता… बॅटरीचा तीव्र प्रकाश डोळ्यात पडल्याने तो थबकला मानवी गोंगाट -आरोळयांनी ब्रुनोला तोंडातून सोडून दिले व दुसर्या मजल्याच्या गच्चीवर जाणार्या जिन्यावर विसावला… सोबतीला दुसरा सहकारी बिबट्या होताच … शेजार्यांनी त्वरित हर्षवर्धन सपकाळ यांना फोन लावला ते काही मिनीटांतच पोहोचले.. बिबट्या कुठे आहे, याचा अंदाज घेत चारचाकी गाडी बाजूला घेतांना हेडलाईट प्रकाश बघून दहा दहा फूट उंचीच्या दोन उड्या मारीत दरीच्या दिशेने पळाला.. तदनंतर वरती जाऊन बघितले असता गॅलरी च्या कोपर्यात जीव मुठीत घेऊन ब्रूनो जखमांनिशी दबकून बसलेला होता… आवराआवर केली तरी एक कोंबडा,एक कबूतर लापता होते तर तीन कोंबड्या सुखरूप… या सर्वांना राहत्या घरी घेऊन येतांना वाटेत व्हेटर्नरी डॉक्टर रविंद्र सुरोशे यांच्याकडे ब्रुनोवर उपचार केले.. ब्रुनो धास्तावलेला होता.. उपचारानंतर तो शांत झाला आणि प्रकरणाचा गोड शेवट झाला. सपकाळ कुटूंबाचा ब्रुनोमध्ये खूप जीव आहे.. बिबट्यांच्या हल्ल्यातून बचावल्यामुळे ब्रुनो आता आणखी लाडका झाला आहे.
_क्रीडा संकुल परिसराच्या मागील डोंगरात मॉर्निंग आणि इव्हिनिंग वॉक करणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बिबट्याच्या या घटनेनंतर या भागात फिरणार्यांना मोठा धोका निर्माण झाला आहे. जंगल सोडून मानवी वस्तीकडे धाव घेणार्या बिबट्यांचा बंदोबस्त वनविभागाने करावा, अशी मागणी क्रीडा संकुल परिसरातील नागरिक करीत आहेत. उन्हाळ्यात पाण्याच्या शोधासाठी अनेक जंगली प्राणी मानवी वस्त्यांकडे फिरकतात, याकडे वनविभाग दुर्लक्ष करीत आहे.