व्हीएसआरएस न्युज राज्यात 45 वर्षांवरील नागरिकांना राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत लसीकरण केले जात असून सुमारे 5 लाख नागरिक लसीच्या दुसऱया डोसच्या प्रतीक्षेत आहेत.
केंद्र शासनाकडून त्यासाठी पुरविण्यात आलेले डोस पुरेसे नसल्याने 18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणासाठी राज्य शासनाने खरेदी केलेल्या डोसेसमधून दुसरा डोस देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, राज्यात आतापर्यंत सुमारे 1 कोटी 84 लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. 45 वर्षांवरील नागरिकांना राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत मोफत लसीकरण केले जाते. सध्या राज्यात कोवॅक्सिन लसीचे 35 हजार डोस शिल्लक आहेत आणि 45 वर्षांवरील सुमारे 5 लाख नागरिक दुसऱया डोसच्या (कोवॅक्सिन) प्रतीक्षेत आहेत.
एवढय़ा मोठय़ा संख्येच्या नागरिकांसाठी हे डोस पुरेसे नसून त्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली आहे.
त्यानुसार 18 ते 44 वयोगटासाठी राज्य शासनाने खरेदी केलेले कोवॅक्सिनचे 2 लाख 75 हजार डोसेस आणि शिल्लक 35 हजार डोसेस असे एकूण सुमारे 3 लाख डोसेस 45 वर्षांवरील नागरिकांसाठी वापरण्यात येणार आहेत. तशा सूचना राज्यातील सर्व लसीकरण केंद्रांना दिल्या आहेत. कोविशिल्डचा देखील दुसरा डोस सुमारे 16 लाख नागरिकांना द्यायचा आहे. राज्य सरकारने खरेदी केलेली लस केंद्र शासनाच्या लसीकरण कार्यक्रमासाठी वापरावी लागणार असल्याने सध्या तरी 18 ते 44 वयोगटातील लसीकरण तूर्त काही दिवसांसाठी कमी करण्याबाबत राज्य टास्क फोर्सशी चर्चा केली जाईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
मधुमेह नियंत्रित नसलेल्या कोरोना रुग्णांमध्ये म्युकर मायकोसीस आजाराचे प्रमाण वाढत असून या आजारावरील प्रभावी ठरलेल्या इंजेक्शनच्या 1 लाख व्हायल्स खरेदी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यासाठी हाफकिनकडे मागणी नोंदविण्यात आली असून तीन दिवसांची निविदा काढून त्याची खरेदी प्रक्रिया केली जाईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.