व्हीएसआरएस न्युज पिंपरी- केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चिखलीतील प्राधिकरण सेक्टर क्र. १७ आणि १९ येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरकुल योजना राबविण्यात येत आहे.
या घरकुल प्रकल्पातील ३ सोसायट्यांच्या इमारती मधील एकूण १२६ लाभार्थ्यांच्या सदनिकांची संगणकीकृत सदनिका वाटप सोडत आज महापौर ढोरे यांच्या हस्ते काढण्यात आली. त्यावेळी लाभार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. चिंचवड येथील अॅटो क्लस्टर मध्ये झालेल्या या कार्यक्रमास सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, शहर सुधारणा समिती सभापती सोनाली गव्हाणे, नगरसदस्या अनुराधा गोरखे, सुनिता तापकीर, शारदा सोनवणे, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे सहाय्यक आयुक्त राजेश आगळे, प्रशासन अधिकारी श्रीकांत कोळप, कार्यालयीन अधिक्षक संभाजी घुले, मुख्य लिपिक सुनिल माने यांच्यासह या विभागातील राजेश जाधव, सुजाता कानडे, दिपक पवार, संदिप भागवत, योगिता जाधव, अंजली खंडागळे तसेच समन्वयक दर्शन शिरूडे आदींसह लाभार्थी उपस्थित होते.
यावेळी नियोजित घरकुल सहकारी गृहरचना सोसायटी क्रमांक १३७ इमारत क्रमांक सी-२४ चे प्रतिनिधी अर्जुन शिंदे, सोसायटी क्रमांक १३८ इमारत क्रमांक सी-१३ चे प्रतिनिधी बाबाजी वाळुंज, सोसायटी क्रमांक १३९ इमारत क्रमांक डी-३० चे प्रतिनिधी अशोक कासुळे यांना संगणकीय सदनिका सोडतीची यादी महापौरांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आली.
सहाय्यक आयुक्त राजेश आगळे यांनी प्रकल्पाची माहिती दिली. तसेच घराचा वापर, येणारे देयके आणि बँकेचे हप्ते वेळेवर भरण्याबाबत मार्गदर्शन केले. माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.
सध्याच्या परिस्थितीत घर घेणे आवाक्याबाहेरचे आहे. आपल्या हक्काचे घर असावे अशी सर्वांना आशा असते. त्यांचे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने घरकुल योजना राबविण्याचा उपक्रम सुरू केला. या उपक्रमातून घर मिळाल्यानंतर लाभार्थ्यांचे जीवनमान निश्चितपणे उंचावले जाणार आहे असे मत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.