Pimpri News : पिंपरी : प्रभू श्रीरामांच्या चरणी आपली सेवा रुजू करून मी धन्य झालो. माझ्या अवघ्या जीवनाचे सार्थक झाले; अशी भावना पिंपरी चिंचवडमधील नामवंत सनई चौघडा वादक रमेश पाचंगे यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
अयोध्येतील मंदिरात रामललाच्या मूर्तीची २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा झाली. अवघ्या देशाने हा सोहळा दृकश्राव्य माध्यमातून अनुभवला. देशभर दिवाळी साजरी करण्यात आली.सारा देश राममय झाला असताना. हा सोहळा ‘याचि देही, याचि डोळा’ पाहण्याचे आणि एव्हढेच नव्हे तर त्यात सहभागी होऊन आपली चौघडावादनाची सेवा श्रीरामाच्या चरणी रुजू करण्याचे भाग्य पाचंगे यांना लाभले.
या सोहळ्यात प्रत्यक्ष मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित असताना त्यांनी चौघडा वादन केले. त्याचबरोबर शरयू किनारी सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमामध्ये ही त्यांनी चौघडा वाजविला. प्रख्यात कथावाचक देवकीनंदन महाराज यांच्या हस्ते त्यांचा खास सत्कारही करण्यात आला.
स्वामी गोविंददेव गिरी महाराजांनी त्याचे चौघडावादन या समारंभात ठेवण्याची सूचना केल्यानंतर पाचंगे यांना शासनयंत्रणेकडून सुरक्षापास, प्रवासाचे तिकिट आदि सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. अयोध्येच्या महापौरांकडे त्यांच्या निवास, भोजन आणि प्रवासासह सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी ती मनःपूर्वक पार पाडल्याचे पाचंगे आवर्जून सांगतात.
अयोध्ये पाचंगे यांचा पाच दिवस मुक्काम होता. या काळात अयोध्येतील भक्तीमय वातावरण पाहून जीवनाचे सार्थक झाले असे पाचंगे यांनी आवर्जून सांगितले.
व्हीएसआरएस न्यूजने पाचंगे यांना अयोध्येत चौघडावादनाचा मान मिळाल्याचे वृत्त सर्वप्रथम दिले होते. त्याची मुद्दाम आठवण ठेवून त्यांनी अयोध्येतील प्रसाद व्हीएसआरएस न्यूजच्या पथकाला दिला, आणि खास आभार मानले.
याबरोबरच पिंपरी चिंचवड मधील सर्वच पत्रकारांना अयोध्येतील प्रसाद देत त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.
Discussion about this post