Pimpri News : पिंपरी : पिंपरी चिंचवडसह पश्चिम महाराष्ट्रात कामगारक्षेत्रात काम करणा-या राष्ट्रीय श्रमिक आघाडी या संघटनेमध्ये मानधन तत्त्वावर काम करणा-या खजिनदाराने संघटनेच्या खात्यातील सुमारे १६ लाख रुपये परस्पर स्वतःच्या व अन्य व्यक्तींच्या नावावर ट्रान्सफर करून संघटनेची आणि अध्यक्षांची फसवणूक केल्याची तक्रार कामगारनेता यशवंत भोसले यांनी पिंपरी पोलीसठाण्यात दिली आहे.
या तक्रारीवरून खजिनदार हेमंत विलास माने वय २५ राहणार काशीळ, ता. जि. सातारा याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार यशवंत भोसले यांच्या राष्ट्रीय श्रमिक आघाडी या संघटनेचे कार्यालय संत तुकारामनगर येथे आहे. या संघटनेत आरोपी मानधन तत्त्वावर काम करत होता. त्याने सप्टेंबर २०२२ ते ८ डिसेंबर २०२३ या काळात बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये असलेल्या संघटनेच्या खात्यातील १६ लाख ८ हजार १९ रुपये परस्पर स्वतःच्या आणि अन्य व्यक्तींच्या खात्यात ऑनलाईन ट्रान्स्फर करून विश्वासघात केला.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर अध्यक्ष यशवंत भोसले यांनी पोलिसात तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपीस अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
Discussion about this post