व्हीएसआरएस न्युज नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 5 ऑगस्ट रोजी अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले आहे. त्यानंतर, मंदिराच्या कामाला गती मिळाली आहे. यानंतर आता उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने अयोध्येत तयार होणाऱ्या विमानतळाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता अयोध्यातील या विमानतळाचं नाव “मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम विमानतळ असं असणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (24 नोव्हेंबर) झालेल्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
अयोध्येतील हे विमानतळ उत्तर प्रदेशमधील पाचवं आंतरराष्ट्रीय विमानतळ असणार आहे. या विमानतळाचं काम सुरू असून पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव मौर्या यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. उत्तर प्रदेशचे सरकार श्रीराम लल्लाची नगरी अयोध्येला जगातील धार्मिक स्थळांमधील एक महत्त्वाचं, अग्रणी स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे असं म्हटलं आहे. हे विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या स्वरुपात विकसित केलं जाणार आहे.