व्हीएसआरएस न्युज प्रतिनिधी-
आपले पाचवे जेतेपद मिळवण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार्या मुंबई इंडियन्स संघाचा सामना इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) अंतिम लढतीत दिल्ली कॅपिटल्स संघाशी होणार आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाने पहिल्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. दुसर्या क्वालिफायरमध्ये सनरायजर्स हैदराबाद संघाला पराभूत केल्याने दिल्लीचा आत्मविश्वास देखील दुणावला आहे.
कोरोना काळात होणार्या या आयपीएलचा आता केवळ एकच सामना शिल्लक आहे. या काळात अनेक आव्हाने आणि अडथळ्यांचा सामना करीत आयपीएलचे यशस्वी आयोजन करण्यात आले. आयपीएलचा सर्वांत यशस्वी कर्णधार असलेल्या रोहित शर्माच्या नजरा या आपल्या पाचव्या जेतेपदाकडे असणार आहेत.
दिल्लीचा संघ पहिल्यांदा इथंवर पोहोचला आहे. पहिल्यांदाच शीर्ष दोन संघ अंतिम लढतीत एकमेकांसमोर आहेत. मुंबईच्या संघाने आपले 15 पैकी 10 सामने जिंकले आहेत तर, दिल्लीने 16 सामन्यांतील नऊ सामन्यांत विजय मिळवला आहे.
मुंबईच्या फलंदाजांनी 130 षटकार मारले आहेत. तर, दिल्लीच्या संघाने 84 षटकार मारले आहेत.क्विंटन-डी-कॉकची कामगिरी यामध्ये लक्षवेधी ठरली. तर रोहितने आपल्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीला बाजूला सारत कर्णधारपदाची जबाबदारी चोखपणे पार पाडली. सूर्यकुमार यादवने देखील आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले. आतापर्यंत त्याने 60 चौकार व 10 षटकार मारले आहेत. ईशान किशनने 29 षटकार मारले आहेत. दिल्लीचे गोलंदाज कॅगिसो राबाडा (29 विकेटस्) आणि एन्रिच नॉर्त्जे (20 विकेटस्) यांच्यासाठी मुंबईच्या फलंदाजांसमोर गोलंदाजी करणे आव्हानात्मक असेल. दिल्लीसाठी शिखर धवनने 600 हून अधिक धावा केल्या आहेत. त्याला जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांचा सामना करावा लागणार आहे. या सत्रातील तीन सामन्यांत दिल्लीच्या संघाला मुंबईने पराभूत केले आहे. त्यामुळे दिल्लीच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल. दिल्लीच्या संघाने दुसर्या क्वालिफायर लढतीत मार्कस स्टोईनिसला सलामीला पाठवले. श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत याचा फॉर्म पाहता शिमरोन हेटमायरवर जलदगतीने धावा करण्याची जबाबदारी असेल. या सामन्याच्या माध्यमातून भविष्यातील भारतीय कर्णधारपदाचा दावा श्रेयस अय्यर करू शकतो.
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंह, अनुकूल रॉय, ख्रिस लिन, धवल कुलकर्णी, दिग्विजय देशमुख, हार्दिक पंड्या, ईशान किशन, जेम्स पॅटिन्सन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, कॅरोन पोलार्ड, कृणाल पंड्या, मिशेल मॅक्लेघन, मोहसीन खान, नॅथन कुल्टर नाईल, प्रिन्स बलवंत राय, क्विंटन-डी-कॉक, राहुल चहर, सौरभ तिवारी, शेरफेन रुदरफोर्ड, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट.
दिल्ली कॅपिटल्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, पृथ्वी शॉ, शिमरोन हेटमायर, कॅगिसो राबाडा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), अक्षर पटेल, संदीप लामिचाने, किमो पॉल, डॅनियल सॅम्स, मोहित शर्मा, एन्रिच नॉर्त्जे, अॅलेक्स कॅरी (यष्टिरक्षक), आवेश खान, तुषार देशपांडे, हर्षल पटेल, मार्कस स्टोईनिस, ललित यादव.