व्हीएसआरएस मराठी न्युज –शासनाने महाराष्ट्रातील प्रत्येक पशुवैद्यकीय संस्थेच्या कार्यक्षेत्रात सरसकट लसीकरण करण्यासाठी परवानगी दिली असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी सांगितले.
सिंह म्हणाले, लम्पी आजार केवळ जनावरांमध्ये आढळून येतो. देशातील आकडेवारीमुळे तसेच समाजमाध्यमांमधून प्रसारित होणाऱ्या बातम्यांमुळे पशुपालकांनी अनावश्यक भीती न बाळगता आवश्यक खबरदारी घ्यावी. लम्पीबाबत विभागाच्या काही सेवांची आवश्यकता वाटत असल्यास अथवा माहिती द्यायची असल्यास संबंधितांनी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखाना, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त स्तरावर किंवा पशुसंवर्धन विभागाचा टोल फ्री क्र.१८००-२३३०-४१८ अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटरमधील पशुसेवेचा टोल फ्री क्र. १९६२ वर तात्काळ संपर्क साधावा, असे त्यांनी सांगितले.
रोग प्रादुर्भावग्रस्त ८ जिल्ह्यामधील गंभीर जनावरांवर उपचार व मार्गदर्शनासाठी महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठातील भीषकशास्त्रातील तज्ज्ञांची १९ पथके नियुक्त करण्याचे निर्देशित करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्रातील ६ पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ दररोज सायं ४ ते ५ दरम्यान दृकश्राव्य माध्यमांद्वारे अधिकाऱ्यांना गंभीर प्रकरणांबाबत मार्गदर्शन व उपचारामध्ये मदत करीत आहेत.
Discussion about this post