व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पिंपरी येथील आर्थिक अडचणीतील सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द केला आहे. तसे आदेश सोमवारी (दि.10) आरबीआयने जारी केले आहेत.
त्यामुळे 10 ऑक्टोबरपासून बँकेने बँकिंग व्यवसाय करणे बंद झाले आहे. दरम्यान, राज्याच्या सहकार आयुक्तांकडून बँकेवर अवसायक नेमण्याबाबत कळविण्यात आले आहे.
रिझर्व्ह बँकेने सेवा विकास बँकेचा परवाना रद्द केल्यामुळे बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईच्या शक्यता नाहीत. त्यामुळे बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या विविध तरतुदींचे पालन करण्यात बँक अयशस्वी ठरली आहे. बँकिंग कायद्यान्वये बँकेचे कामकाज चालू ठेवणे तिच्या ठेवीदारांच्या हितासाठी प्रतिकूल आहे. बँकेची सध्याची आर्थिक स्थिती ही तिच्या सध्याच्या ठेवीदारांना पूर्ण पैसे देऊ शकणार नाही. बँकेला बँकिंग व्यवसाय चालू ठेवण्याची परवानगी दिल्यास सार्वजनिक हितावर प्रतिकूल परिणाम होईल, असेही मत आरबीआयने नमूद केले आहे. तसेच सेवा विकासचा परवाना रद्द केल्यामुळे बँकिंग नियमन कायदा 1949 अन्वये बँकेला ठेवी स्वीकारणे आणि ठेवींची परतफेड करणे यांचा समावेश असलेल्या ‘बँकिंग’चा व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली आहे.
Discussion about this post