व्हीएसआरएस न्युज नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी या दोन हिरे व्यापाऱ्यांनी मिळून पंजाब नॅशनल बँकेचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवले. कर्ज बुडवून दोघेही फरार झाले. यापैकी मेहुल चोक्सी याला डॉमिनिका (dominica) या देशात स्थानिक पोलिसांच्या क्राइम ब्रँचने अटक केली आहे.
तर नीरव मोदी इंग्लंडच्या जेलमध्ये आहे. नीरवला भारतात आणण्यासाठी इंग्लंडच्या कोर्टात कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
मेहुल अँटिगुआ येथे लपल्याची माहिती भारताकडे होती. पण तीन दिवसांपूर्वी तो तिथून गायब झाल्याचे वृत्त आले. नीरव आणि मेहुल विरोधात इंटरपोलने भारताच्या मागणीनंतर रेड कॉर्नर नोटीस काढली होती.
या नोटीस आधारेच नीरवला इंग्लंडमध्ये अटक झाली. पण मेहुल चोक्सी जेलबाहेर राहण्यात यशस्वी ठरला होता. तो अँटिगुआ येथून फरार झाल्याचे कळताच जगभर संभाव्य ठिकाणी शोध सुरू झाला. अखेर डॉमिनिका या देशात स्थानिक पोलिसांच्या क्राइम ब्रँचने मेहुलला अटक केली. लवकरच मेहुलला अँटिगुआच्या पोलिसांच्या हाती सोपवले जाईल. भारत सरकार अँटिगुआतील कोर्टात दाद मागून मेहुलचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे.
पंजाब नॅशनल बँकेचे १३ हजार ५०० कोटी रुपये बुडवल्याच्या प्रकरणात मेहुल चोक्सी एक आरोपी आहे. तो वाँटेड आहे. मेहुल चोक्सीला त्याच्या वकिलाने तसेच काही नागरिकांनी कारमधून अज्ञात ठिकाणी जाताना बघितले होते. नंतर मेहुलशी संपर्क होत नव्हता म्हणून पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. पोलिसांचा तपास सुरू असतानाच डॉमिनिका या देशात स्थानिक पोलिसांच्या क्राइम ब्रँचने मेहुलला अटक केल्याचे वृत्त आले.
मेहुल चोक्सी (६२) २३ मे पासून बेपत्ता होता. त्याचा शोध लावण्याचा प्रयत्न सुरू होता. अखेर मेहुलला डॉमिनिका या देशात स्थानिक पोलिसांच्या क्राइम ब्रँचने अटक केली. मेहुल २०१८ मध्ये भारतातून फरार झाला. पण त्याआधी २०१७ मध्येच त्याचे कॅरेबियन बेटांच्या समुहतील अँटिगुआतल्या बारबुडाची नागरिकता मिळवली होती. भारतात अटक होण्याची शक्यता जाणवू लागताच मेहुल गुपचूप अँटिगुआला पळून गेला होता. तिथेही अटकेची शक्यता जाणवू लागताच त्याने पुन्हा पलायन केले. मात्र हा प्रयत्न अयशस्वी ठरला. मेहुलला डॉमिनिकामध्ये अटक झाली.