व्हीएसआरएस न्युज पुणे- सक्त वसुली संचालनालयाने अर्थात ईडीकडून पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची जवळपास 40 कोटी 34 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
विदेशी विनिमय व्यवस्थापन कायदा कलम 1999 (फेमा)चे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये पुणे, नागपूर आणि गोव्यातील हॉटेलसह मालमत्तांचा समावेश आहे. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
पेशाने बांधकाम व्यावसायिक असलेल्या अविनाश भोसले यांच्या पुणे, मुंबई येथील कार्यालय, निवास या ठिकाणी सक्त वसुली संचालनालयाकडून (ईडी) मागील काही महिन्यांपासून छापे टाकण्यात येत होते.
अविनाश यांचे पुत्र अमित यांचीही फेब्रुवारी महिन्यात मुंबईत चौकशी करण्यात आली होती. बॅलार्ड पिअर येथील कार्यालयात त्यांच्याकडे चौकशी सुरू होती.
भोसले यांच्यावर परदेशात अवैधरीत्या मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप होता. त्यामुळे ईडीने परकीय चलन नियमन कायदा (फेमा) १९९९ अंतर्गत भोसले यांची पुणे आणि नागपूरमधील 40 कोटी 34 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केल्याची माहिती ट्विटरद्वारे दिली आहे. अविनाश भोसले हे पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक आहेत. अविनाश भोसले यांचे पुत्र अमित भोसले यांच्या नावावर असणारी मालमत्ताही जप्त करण्यात आली आहे.
ईडीकडून अविनाश भोसले यांच्या पुणे, गोवा आणि नागपूर या ठिकाणची संपत्ती जप्त केली आहे. यामध्ये पुण्यातील हॉटेल वेस्टीन, गोव्यातील हॉटेल डब्ल्यू रिट्रीट आणि नागपूरमधील लि मेरिडीयन यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात एबीएल ग्रुप अथवा भोसले यांच्याकडून कोणतीही माहिती रात्री उशिरापर्यंत देण्यात आली नव्हती.
Discussion about this post