व्हीएसआरएस मराठी न्युज –पिंपरी-चिंचवड महापालिकेत २०१७ ते २०२२ या भाजपच्या सत्ताकाळात आणि प्रशासकीय राजवटीत प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला आहे. सल्लागाराच्या नावाखाली भाजपची मंडळी दिवसाढवळ्या पालिकेची लूट करीत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी पत्रकार परिषदेत केला. बोगस कागदपत्रे सादर करणाऱ्या गुजरातच्या सल्लागारावर पालिका प्रशासन मेहेरबान असल्याचेही भापकर यांनी म्हटले आहे.
पिंपरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदपवार) गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, मानव कांबळे, काँग्रेसचे नरेंद्र बनसोडे, विश्वनाथ जगताप, विठ्ठल शिंदे, सतीश पाटील, प्रकाश जाधव, सतीश काळे आदी उपस्थित होते. भापकर म्हणाले, गुजरातमधील हार्दिक के. पांचाळ या सल्लागाराने महापालिकेच्या उद्यान विभाग, स्थापत्य विभागासह विविध विभागांत करोडोंचा सल्ला दिला आहे. सल्लागार म्हणून पालिकेच्या पॅनेलवर नियुक्ती होण्यासाठी पांचाळ यांनी बोगस कागदपत्रे जमा केली.
त्याआधारे सुमारे १०० ते १२५ कोटी रुपयांची कामे केली आहे. बोगस कागदपत्रे देऊन फसवणुक केल्याप्रकरणी या सल्लागाराला काळ्या यादीत टाकून त्याच्यावर ४८ तासांत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी फौजदारी गुन्हा दाखल करावा. गुन्हा दाखल न केल्यास आयुक्तांचाही यामध्ये सहभाग असल्याची शक्यता असल्याचे स्पष्ट होईल. पांचाळ याच्याकडून पालिकेने अदा केलेली रक्कम वसूल करावी. अन्यथा, तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.
संबंधित सल्लागार हार्दिक के. पांचाळ यांच्या कागदपत्रांची तपासणी केली जाईल. यामध्ये दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल.
– मकरंद निकम, शहर अभियंता
खासदार, आमदारांचे महापालिकेत ठेके
■ शहरातील सत्ताधारी पक्षाच्या खासदार, आमदार यांची कार्यकर्त्यांच्या नावाने ठेकेदारी सुरू आहे. हे ठेकेदार निविदेमधील अटी, शर्तीचा भंग करतात. वाढीव दराने कामे करून खासदार, आमदार महापालिकेच्या तिजोरीवर दिवसाढवळ्या दरोडा टाकण्याचे काम करत असल्याचा आरोपही भापकर यांनी केला आहे.
Discussion about this post