पुणे | (व्हीएसआरएस न्यूज) | दहशत माजविणाऱ्या कुविख्यात सचिन माने व त्याच्या टोळीवर पोलीस आयुक्त रितेश कुमार (Ritesh Kumar) यांनी मोक्का कारवाई केली आहे. टोळीत 13 जणांचा समावेश असून, एका अल्पवयीन मुलाचा देखील सहभाग आहे. पोलीस आयुक्तांची ही 16 वी कारवाई आहे. यापूर्वी सचिन माने याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई केली होती. त्यानंतर त्याने कारागृहातून परतल्यानंतर देखील गुन्हे केले. सचिन परशूराम माने, निखील राकेश पेटकर, रोहीत मधुकर जाधव, अजय प्रमोद डिखळे, यश किसन माने, अमर तानाजी जाधव, विजय प्रमोद डिखळे, मोन्या उर्फ सुरज सतिष काकडे यांना अटक केली आहे.
तर, त्यांचे चार साथीदार पसार असून, एक अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. सचिन माने व त्याच्या टोळीने मीनाताई ठाकरे वसाहतीत तुफान राडा घालत चौघांवर वार केले होते. तसेच पार्क केलेल्या गाड्यांची तोडफोड करून दहशत माजविली होती. तर, देवीचा प्रसादाचे पातीलेही उलथून टाकले होते. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात खूनाच्या प्रयत्नासह इतर कलमांनुसार गुन्हा नोंद करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास करताना टोळीची परिसरत दहशत असून, त्यांच्याकडून सतत गुन्हे केले जात असल्याचे समोर आले.
त्यानंतर या टोळीवर मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव परिमंडळ दोनच्या उपायुक्त स्मार्थना पाटील यांच्यामार्फत पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे सादर केला होता. या प्रस्तावाची छाननी केल्यानंतर पोलीस आयुक्तांनी कारवाई करण्याचे आदेश दिले.
Discussion about this post