व्हीएसआरएस मराठी न्युज -आरेतील मेट्रो कारशेडसाठी177 झाडे तोडण्यासाठी मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी परवानगी दिली आहे.
मात्र, या निर्णयानंतर पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. या निर्णयाच्या विरोधात पर्यावरणप्रेमींनी पुन्हा एकदा उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्याची दखल घेत हायकोर्टानं या प्रकरणावर शुक्रवारी सुनावणी घेण्याचं निश्चित केलं आहे.
आरेतील मेट्रो- 3 च्या कारशेडसाठी अतिरिक्त 84 झाडे तोडण्यास सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिलेली असताना महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडे 177 झाडे तोडण्याची परवानगी मागितली होती. त्याविरोधात याआधीही पर्यावरणप्रेमींनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित असल्यानं याप्रकरणी तिथेच किंवा वृक्ष प्राधिकरणाकडे दाद मागण्याची सुचना देऊन न्यायालयानं याचिकाकर्ते झोरु बाथेना यांच्या याचिकेत हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता. आता याच अतिरिक्त 177 वृक्षतोडीच्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननं केलेल्या अर्जावर मुंबई पालिकेच्या आयुक्तांनी नुकताच निर्णय घेऊन ती सारी 177 झाडे तोडण्यास परवानगी दिली आहे. परंतु पालिका आयुक्तांनी दिलेल्या मंजुरीबाबतचा निर्णय पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर अथवा वृत्तपत्रांत नोटीस प्रसिद्ध न करुन वृक्ष प्राधिकरण समितीनं कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केलेल्या याचिकेत करण्यात आला आहे.
Discussion about this post