व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –मीडियापुढे चमकोगिरी करणाऱ्या गुणरत्न सदावर्तेंना मंगळवारी महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलने मोठा दणका दिला.
वकिलाचा गाऊन आणि बँड परिधान करून आंदोलन करणे सदावर्तेंना चांगलेच भोवले असून बार कौन्सिलने त्यांची वकिली सनद दोन वर्षांसाठी निलंबित केली आहे.
काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने शिस्तभंगाची कारवाई रोखण्यास नकार देत त्यांची याचिका धुडकावली होती. त्यापाठोपाठ बार कौन्सिलने निलंबनाचा झटका देत सदावर्तेंच्या चमकोगिरीचा ‘बँड’ वाजवला.
सदावर्ते यांनी वकिलाचा गाऊन परिधान करीत मुंबईतील विविध आंदोलनात भाग घेतला होता. किंबहुना आझाद मैदानावरील आंदोलनात गाऊन आणि बँड घालून डान्सदेखील केला होता. तसेच जोरजोरात ओरडून स्वतःच्या आक्रस्ताळेपणाचे दर्शन घडवले होते. सतत चर्चेत राहण्यासाठी त्यांनी केलेला हा खटाटोप समस्त वकिलांची प्रतिमा मलीन करणारा आहे, असा आरोप करीत ऍड. सुशील मंचेकर यांनी गेल्या वर्षी सदावर्ते यांच्याविरुद्ध बार कौन्सिलकडे तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीची गंभीर दखल घेत बार कौन्सिलने 7 फेब्रुवारीला सदावर्तेंविरोधात शिस्तभंगाची कारवाई सुरू केली. त्यामुळे पायाखालची वाळू सरकताच सदावर्ते यांनी कारवाई रोखण्यासाठी उच्च न्यायालयापर्यंत धावाधाव केली. तथापि, न्यायालयाने त्यांना चांगलेच फटकारत याचिका धुडकावली होती.
बार कौन्सिलने मंगळवारी सदावर्ते यांची वकिली सनद दोन वर्षांसाठी निलंबित करून त्यांना मोठा दणका दिला. याबाबत मंचेकर यांची तक्रार सुरुवातीला एकसदस्यीय समितीने विचारात घेतली होती. नंतर ही तक्रार त्रिसदस्यीय समितीकडे पाठवण्यात आली. या समितीने सदावर्ते यांच्या कृत्यावर आक्षेप घेत थेट दोन वर्षांसाठी सदावर्ते यांची वकिली सनद निलंबित करण्याचा निर्णय घेतला.
Discussion about this post