व्हीएसआरएस मराठी न्युज नवी दिल्ली : गुजरातमध्ये देशाच्या बँकिंग इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा समोर आला आहे. ABG शिपयार्ड या जहाज बांधणी आणि दुरुस्ती करणाऱ्या कंपनीने स्टेट बँकेसह विविध २८ बँकांना तब्बल २२ हजार ८४२ कोटींचा चुना लावला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील बँकिंग संघाकडून या फसवणूक संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे, अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले.
सीबीआयने या फसवणूक प्रकरणात ABG शिपयार्ड लिमिटेड कंपनीचे तत्कालीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ऋषी कमलेश अग्रवाल आणि इतर संचालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या २८ बँकांनी ज्या उद्देशासाठी कर्ज पुरवठा केला होता, त्याऐवजी तो निधी अन्य कारणांसाठी वळवण्यात आला. या निधीतून कंपनीच्या संचालकांवर विविध ठिकाणी अनेक मालमत्ता बनविल्या आणि खरेदी केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून, याची सीबीआयकडून चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, हे कर्ज वाटप करण्यामागे बँकेतील अनेक सरकारी कर्मचारी, अधिकारी आणि खासगी लोकांची संदिग्ध भूमिका असल्याचा संशय सीबीआयला आहे. सीबीआयने नोंदवलेला हा आज पर्यंतचा सर्वात मोठा बँक फसवणूकीचा गुन्हा आहे. यापूर्वी विजय मल्याने ९ हजार कोटी तर निरव मोदी आणि मेहूल चोक्सी या जोडगोळीने १३ हजार कोटींना बँकाना चुना लावला आहे. आता गुजरातमध्येच २२ हजार ८४२ कोटी रुपयांना चुना लावल्याचे समोर आले आहे.
Discussion about this post