पुणे | (व्हीएसआरएस न्यूज) | पुणे-नाशिक द्रुतगती रेल्वे मार्गात विविध अडथळे येत असताना दुसरीकडे पुणे-नाशिक हरित महामार्गाचा सर्वंकष प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन – एमएसआरडीसी) सल्लागार कंपनीची नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे पुणे- नाशिक द्रुतगती रेल्वे मार्गापेक्षा हा महामार्ग पूर्णत: वेगळा आहे.
केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाकडून पुणे-नाशिक द्रुतगती रेल्वेमार्ग बांधण्याचे प्रस्तावित आहे. या रेल्वे मार्गाची आखणी पूर्ण झाली असून केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकारने त्याला मान्यता दिली आहे. तसेच या रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाचे काम देखील सुरू झाले. अंतिम मान्यतेचा प्रस्ताव केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे. या रेल्वे मार्गाला संलग्न पुणे ते नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गाचा तांत्रिक आणि वित्तीय सुसाध्यता अहवाल तयार करणेबाबतचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रस्ते महामंडळाला दिले होते. त्यावरून द्रुतगती रेल्वे की महामार्ग यावरून वाद सुरू झाला होता. मात्र, जानेवारी महिन्यात महारेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत फडणवीस यांनी रेल्वे प्रकल्पाला गतीने मान्यता देणार असल्याचे जाहीर केल्यानंतर या वादावर पडदा पडला होता.
Discussion about this post